नक्षलग्रस्त जेठभावडा स्वच्छतेतही ठरतेय जिल्ह्यात आदर्श
By admin | Published: January 22, 2017 12:46 AM2017-01-22T00:46:59+5:302017-01-22T00:46:59+5:30
स्वच्छतेची गोष्ट असो की, जलयुक्त शिवार अभियानाची असो, किंवा केंद्र सरकारच्या डिजिटल अभियानाची असो,
७० टक्के आदिवासी गाव : गावात प्रत्येक घरासमोर कचराकुंडी
नरेश रहिले गोंदिया
स्वच्छतेची गोष्ट असो की, जलयुक्त शिवार अभियानाची असो, किंवा केंद्र सरकारच्या डिजिटल अभियानाची असो, या सर्वात देवरी तालुक्यातील जेठभावडा हे गाव आदर्श ग्राम पंचायत म्हणून नावारूपास येत आहे. आयएसओ मानांकित जेठभावडा ग्राम पंचायत १०० टक्के हागणदारीमुक्त झाली आहे. या गावात कचऱ्याचे ढिगारे सोडा कचऱ्याचा एक तुकडाही दिसत नाही.
देवरी तालुक्याच्या अतिदुर्गम नक्षलग्रस्त व आदिवासी भागात १५०० लोकसंख्या असलेले जेठभावडा हे गाव आहे. या गावातील ७० टक्के जनता आदिवासी आहे. येथील सरपंच डॉ. जितेंद्र रहांगडाले यांच्या प्रयत्नाने ग्राम पंचायत डिजिटल झाली आहे. या ग्राम पंचायत अंतर्गत असलेल्या प्रत्येक घरात शौचालय तयार करण्यात असाले.
त्यामुळे उघड्यावर शौच करणाऱ्यांना पकडण्यासाठी आलेल्या गुडमार्निंग पथकाला खाली हाताने परतावे लागले. सकाळी ६ वाजता ‘गुड मॉर्निंग’ पथक जेठभावडा येथे पोहचले. या ग्राम पंचायत अंतर्गत जेठभावडा, सिंदीबिरी व मसूरभावडा मध्ये स्वत: जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) राजेश देशमुख, देवरीचे गटविकास अधिकारी पांडे, सरपंच डॉ. जितेंद्र रहांगडाले, ग्रामसेवक व इतर अधिकारी-कर्मचारी सतत तीन तास गावात वॉच करीत होते. परंतु एकही व्यक्ती उघड्यावर शौचास जातांना दिसले नाही. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) राजकुमार पुराम देवरी तालुक्याचे पालक अधिकारी आहेत. त्यांनी देवरी तालुक्याला हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प केला आहे.