सामाजिक बंडाने वैचारिक क्रांती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:20 AM2021-07-04T04:20:31+5:302021-07-04T04:20:31+5:30
अर्जुनी मोरगाव : बहुजन समाज हजारो वर्षापासून रूढी-परंपरांमध्ये गुरफटून असल्याने प्रगतीच्या प्रवाहापासून दूर होता. आर्थिक-सामाजिक आणि शैक्षणिक बाबी या ...
अर्जुनी मोरगाव : बहुजन समाज हजारो वर्षापासून रूढी-परंपरांमध्ये गुरफटून असल्याने प्रगतीच्या प्रवाहापासून दूर होता. आर्थिक-सामाजिक आणि शैक्षणिक बाबी या मानवी विकासाच्या त्रिसूत्री आहेत. या घटकांपासून दूर ठेवण्याचे कारस्थान तत्कालीन शत्रूंनी केले. अंधारात झोपलेल्या या समाजाला जागविण्याचे काम जगद्गुरू तुकोबाराय, छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषांच्या विचारांनी केले. आज हा बहुजन समाज अनेक क्षेत्रांमध्ये अग्रेसर आहे. याचा पाया शेकडो वर्षांपूर्वी महापुरुषांनी दिलेल्या विचारांनी झाला. विचार मरत नसतात, विचारांच्या बंडांनी अनेक क्रांत्या झाल्या. महापुरुषांच्या वैचारिक बंडाने सामाजिक क्रांती झाल्याचे विचार तालुकास्तरीय कुणबी समाज संघटनेचे मार्गदर्शक डॉ. दिलीप काकडे यांनी व्यक्त केले.
स्थानिक शिव रेसिडेन्सीमध्ये आयोजित संघटनेच्या सहविचार सभेत ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अनिरुद्ध ढोरे, योगशिक्षक दादा फुंडे, पतिराम मुनेश्वर, देवीदास ब्राह्मणकर, माजी नगरसेविका गीता ब्राह्मणकर, शिवचरण राघोर्ते उपस्थित होते. समाजाचे आणि मातीचे ऋण फेडण्यासाठी प्रत्येकाने समाजकार्यात वेळ द्यावा. कोरोना महामारीने अनेक कुटुंबे उघड्यावर आली. गरजूंना मदत करून सामाजिक ऋण फेडण्यासाठी समाजाने कार्य करण्याचे आवाहन दादा फुंडे यांनी केले. डॉ. दिलीप काकडे हे महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झाले. संघटनेच्यावतीने शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिरुद्ध ढोरे, संचालन गिरीश बागडे, आभार डॉ. दीपक रहिले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी होमदास ब्राह्मणकर, गणेश फुंडे, संपत कठाणे, उद्धव मेहेंदळे, राजू शिवणकर यांनी सहकार्य केले.