आई घराचे मांगल्य तर बाप अस्तित्व

By admin | Published: March 1, 2016 01:11 AM2016-03-01T01:11:27+5:302016-03-01T01:11:27+5:30

नारी म्हणजे चिंगारी आहे, ती चटके देणारी नको, प्रकाश देणारी हवी आहे.

If the mother asks for home, then the father is alive | आई घराचे मांगल्य तर बाप अस्तित्व

आई घराचे मांगल्य तर बाप अस्तित्व

Next

सिंधूताई सपकाळ यांचे प्रतिपादन : तिरोडाच्या बुनियादी शाळेत रंगले आत्मकथन
तिरोडा : नारी म्हणजे चिंगारी आहे, ती चटके देणारी नको, प्रकाश देणारी हवी आहे. पोरांनो कणखर व्हा, रंगदार व्हायला शिका, मुलीनी अंगावर आवश्यक तेवढे कपडे वापरा मादी वाटायला नको माय वाटायला पाहिजे. सकाळी लवकर उठून कामाला लागणारी ते रात्री उशीरापर्यंत सतत काम करणारी आई असते तर अ‍ॅडमिशनसाठी धडपडणारा बाप असतो. टोपलीत जर एकच तुकडा असेल तर बाप म्हणतो मला भूक नाही आई म्हणते मी आताच जेवले व पोरासाठी तुकडा देतात असे आई-बाप असतात. आई घराचे मांगल्य असते तर बाप दाराचे अस्तित्व असते असे मत सिंधुताई सपकाळ यांनी काढले.
तिरोडाच्या उत्तर बुनियादी शाळेच्या पटांगणावर आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. युवा महिला संघटना तिरोडाच्या वतीने आ. विजय रहांगडाले यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला.
त्या पुढे म्हणाल्या, लेकरांनो जिद्दीने सामोरे जा, प्रेम म्हणजे उर्जा आहे. प्रेम त्याग शिकविते भोग नाही. मी फक्त ४ थी पास आहे. म्हशी चारायला नेणे, उरल्या वेळेत शाळेत जाणे, उशीरा शाळेत गेल्याने मास्तरांनी मारले, म्हशी शेतात गेल्याने शेतकऱ्यांनी मारले अशी मार खात-खात ४ थी पास केले. रेल्वेत भिक मागायचे काम केले. आमची संस्कृती ही ओरबाडून खायची नाही वाटून खायची आहे. पूर्वी मी स्मशानात रहायचे आता मात्र स्मशासनाच्या उद्घाटनाला मला बोलाविले जाते. पोलीस सतत काम करून आपले संरक्षण करतात. पत्रकार विना संरक्षण आगीत दंगलीत घुसतात. त्याचा आदर करा, कपन को जेब नही होते और मौत कभी रिश्वत नही लेती.
आपल्या स्वत:च्या मुलीला दगडू शेट हलवाईला स्वाधीन करून अनाथ मुलींची माई बनली. स्वत:ची मुलीची जास्त आपुलकी राहीली. आज मी २८२ जावयांची सासू असून ७५० पुरस्कार प्राप्त केले आहे. पतीला मी माफ केले आहे मुलींनो माफ करायला शिका, आज हा मुलगा एल.एल.बी.करतोय हा सवा महिन्याचा असतांना आई मरण पावली रेल्वे स्थानकावर तो आता मोठा होणार. कावळे, चिमन्या नुसत्या उडतात. झेप मात्र गरूडच घेतो. झेप घ्यायला शिका बाळांनो, उघड्या अंगाची आमची संस्कृती नाही जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई आणि मी सुध्दा नऊवारी नेसतो, त्यामुळे सर्व अंग झाकून इतिहास घडविला. माझे म्हणणे नऊवारी घाला असे नाही पण अंग झाकेला एवढे कपडे मात्र जरूर घाला. पाहणाऱ्यांची नजर बदलली पाहिजे.
सासरला माझा सत्कार झाला ७ कॅबीनेट मंत्री हजर होते. पती रडत होते, त्यांना समजावले तुम्ही पण या परंतु पती म्हणून नाही तर बाळ म्हणून या, मला पत्नी होता येणार नाही. त्यांना घेऊन मी गेलो आता माझ्या म्हणण्यानुसार वागत असतो. स्वत:ला गाडून घ्यावे लागते नव्याने उगवण्यासाठी त्याला संस्कार म्हणतात. माझा मुलगा माझ्यावर पी.एच.डी. करीत आहे. पुणे विद्यापीठामध्ये दु:खापर्यंत येते ती आई व वेदना पदरात घेते ती माई असे गाडी देणाऱ्या कंत्राटदाराने संबोधले ते वाक्य गाडीच्या मागे लिहिले आहे, असे आत्मकथन, स्व:अनुभव सांगून सिंधुताई सपकाळ यांनी प्रेक्षकांना भारावून टाकले.
यावेळी मंचावर मनोहरभाई अ‍ॅकेडमीच्या अध्यक्षा वर्षा पटेल, माजी जि.प.उपाध्यक्ष मदन पटले, युवा महिला संघटनेच्या अध्यक्षा ममता आनंद बैस अदानी फाऊंडेशनचे सुबोध सिंग, पोलीस निरीक्षक संजय देशमुख उपस्थित होते.
यावेळी आ. विजय रहांगडाले त्यांनी राजकारणातून समाजकारण करतांना कुठे तरी स्वार्थ दडलेला असतो. परंतु समाजकारणातून नि:स्वार्थ भावनेतून दिनदुबळ्या अनाथांची सेवा हा खरा समाजकारण असल्याचे सांगितले. यावेळी वर्षा पटेल, संजय देशमुख यांनीही मार्गदर्शक केले. संचालन अ‍ॅड. माधुरी रहांगडाले, मंदाकिनी गाढवे, प्रास्ताविक ममता आनंद बैस, आभार रूबीना मोतीवाला यांनी मानले. विद्यार्थ्याना अदानी फाऊंडेशनतर्फे सौर लॅम्प व सिलाई मशीनचे वितरण केले. यशस्वीतेसाठी वनमाला डहाके,प्रिती पुडके, सोनाली सोनकांबळे, राणी बालकोटे व इतर सदस्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: If the mother asks for home, then the father is alive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.