शाळेची तुकडी टिकेल तर नोकरी टिकेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:10 AM2021-08-02T04:10:39+5:302021-08-02T04:10:39+5:30
देवरी : शासनाने सन २००४-०५ मध्ये राज्यात हजारो उच्च माध्यमिक शाळांची विना अनुदान तत्त्वावर खैरात वाटली. त्यानंतर सन २००८-०९ ...
देवरी : शासनाने सन २००४-०५ मध्ये राज्यात हजारो उच्च माध्यमिक शाळांची विना अनुदान तत्त्वावर खैरात वाटली. त्यानंतर सन २००८-०९ मध्ये परत कायम विना अनुदान तत्त्वावर शाळांना परवानगी दिली. सन २००४ पासून उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांना एक रुपया पगार न देता किंवा शाळांना अनुदान न देता शासनाने उच्चशिक्षित शिक्षकांची पिळवणूक केली. शेकडो आंदोलन व मोर्चे काढल्यानंतर मागील ५-६ वर्षांपासून अनुदान मूल्यांकन करून १३ सप्टेंबर २०१९ रोजी राज्यातील काही शाळा २० टक्के अनुदानासाठी घोषित केल्या. परंतु या शाळांतील शिक्षकांचा १८ महिन्यांचा पगार घशात घालून १ नोव्हेंबर २०२० पासून २० टक्के अनुदान घोषित केले व सध्या या शिक्षकांना पगार सुरू आहे.
सन २०१४ नंतर शासनाने कोणत्याच नियमांचे पालन न करता परत स्वयं अर्थसाहाय्यता या तत्त्वावर मागेल त्याला उच्च माध्यमिक शाळा उघडण्याची परवानगी दिली. सन २००१ पूर्वीचे शाळा उघडण्याचे शासकीय नियम प्राथमिक शाळेसाठी ३ किलोमीटर, माध्यमिक शाळेसाठी ५ किलोमीटर आणि उच्च माध्यमिक शाळेसाठी ९ किलोमीटर अशी अट असताना शासनाने स्वयं अर्थसाहाय्य तत्त्वावर मागेल त्याला शाळा देऊन शाळांची खैरात वाटली. आजघडीला कायम विना अनुदान तत्त्वावर शाळा सुरू होत्या त्या ठिकाणी एक तुकडी कशीबशी चालत होती. परंतु स्वयंअर्थसाहाय्यित तत्त्वावर उच्च माध्यमिक शाळांना परवानगी दिल्यानंतर आज राज्यातील बऱ्याच उच्च माध्यमिक शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. परंतु येणाऱ्या काळात जर अशीच अवस्था राहिली तर आज २० टक्के अनुदानावर आलेल्या शाळा एके दिवशी बंद झाल्याशिवाय राहणार नाही. शासनाने उच्च माध्यमिक शाळेला परवानगी देताना शाळा उघडण्याच्या अटी व शर्ती आहेत त्यांचे पालन करून नवीन शाळांना परवानगी द्यावी.
------------------------------
नोकरी टिकविण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांच्या दारी
इयत्ता ११ वीच्या प्रवेशासाठी शिक्षकांमध्ये शर्यती लागल्या आणि विद्यार्थ्यांच्या शोधात शिक्षकांना मजुरासारखे गावोगावी फिरावे लागत आहे. उच्च माध्यमिक शाळेत करणाऱ्या उच्चशिक्षित शिक्षकांची अवस्था फारच बिकट झाली आहे. शाळेची तुकडी टिकेल तर नोकरी टिकेल व तुकडी तुटली तर नोकरी जाईल या भीतीने उच्च माध्यमिक शिक्षक दिवसाची रात्र करून ११ वी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे प्रलोभन देऊन विद्यार्थ्यांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करून कशीतरी आपली तुकडी टिकवून ठेवतो.