असे असेल तर दादा खरंच तुम्ही एकदा या...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 12:29 AM2018-12-20T00:29:11+5:302018-12-20T00:30:02+5:30
२००९ ते २०१४ या काळात राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. त्या काळात अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले होते. रस्त्याच्या दुर्दशेवर ते सत्तापक्षावर बरीच आगपाखड करायचे.
संतोष बुकावन ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : २००९ ते २०१४ या काळात राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. त्या काळात अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले होते. रस्त्याच्या दुर्दशेवर ते सत्तापक्षावर बरीच आगपाखड करायचे. सत्ताधारी पक्ष विरोधकांच्या कार्यक्षेत्रात निधीच उपलब्ध करुन देत नाही अशी त्यांची खंत होती. ही खंत त्यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळण्यापूर्वी प्रसार माध्यमांसमोर बोलून दाखविली होती. बडोले साहेब आता तर तुम्ही सत्ताधारी पक्षात कॅबीनेट मंत्री आहात, तुम्हाला वडसा-कोहमारा रस्त्यांची दुर्दशा सुध्दा माहिती आहे. तुमचे विरोधक शासन व प्रशासनाला शरम नाही म्हणून चक्क रस्त्यावर बेशरमाची झाडे लावून आंदोलन करीत आहेत.
गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याला जोडणारा वडसा-कोहमारा हा मार्ग आहे. या मार्गावर ठिकठिकाणी असंख्य खड्डे पडले आहेत. ते खड्डे बुजविण्यासाठी दरवर्षी लाखोंचा खर्च केला जातो. परंतु पुन्हा खड्डे जैसे थे राहत आहेत. खड्डे बुजविण्यासाठी आतापर्यंत जेवढा खर्च झाला तेवढ्या रकमेत नवीन मार्ग तयार झाला असता असे प्रवाशांसह वाहनधारकांचे म्हणणे आहे. या रस्त्याची अनेक ठिकाणी दयनीय अवस्था झाली आहे. वाहन चालकांना अगदी जीव मुठीत धरुन वाहन चालवावे लागतात. अनेक ठिकाणी भगदाड पडले आहेत. त्यामुळे हा रस्ताच खड्डयात गेला आहे. परिणामी या रस्ता कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होतात. दिवसेंदिवस या मार्गावर खड्यांची श्रृंखला वाढत आहे. सहा-सहा फुट लांबीपर्यंत रस्ता ठिकठिकाणी फुटला असल्याने वाहन कसे चालवावे असा प्रश्न वाहन चालकांना पडतो. रात्रीचे वेळी तर दुचाकीस्वारांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. याकडे संबंधित विभागाने तर डोळे मिटूनच ठेवण्यात धन्यता मानल्याचे चित्र आहे.
मागीलवर्षी याच मार्गाने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दौरा केला होता. ते या मार्गाने जाणार असल्याचे नक्की झाल्यानंतर या रस्त्यावरील खड्डे बुजवून अगदी नववधूसारखी सजावट केली होती. हे जर मंत्रीमंहोदयाच्या आगमनाप्रित्यर्थ शक्य होत असेल तर ते इतर वेळात का होत नाही. हा बुचकळ्यात पाडणारा प्रश्न आहे. मागीलवर्षी महामार्गावरील खड्डे बुजविण्याचा संकल्प शासनाने केला होता. यावर प्रचंड खर्च करण्यात आला. त्याचठिकाणी व काही नवीन भागात पुन्हा नव्याने आता खड्डे पडू लागले आहेत. एवढ्या खर्चात नवीन रस्ता तयार झाला असता याकडे कुणाचेही लक्ष नाही. म्हणून एकदा सांगावेसे वाटते की, दादा तुम्ही एकदा नक्कीच या! निदान आपल्या पदस्पर्शाने पुन्हा एकदा या रस्त्यावरील खड्डे बुजतील व वाहनचालकांना हायसे वाटेल. अलीकडे रस्त्याचे ही राजकारण होऊ लागले. साकोली-वडसा-गडचिरोली व कोहमारा-वडसा-गडचिरोली हे ३५३ सी क्रमांकाचे समांतर रस्ते आहेत. कलकत्ता, मध्यप्रदेश व छत्तीेसगड या मार्गाने गडचिरोलीकडे जाणारी वाहतूक ही कोहमारा-वडसा या मार्गाने होते. याऊलट कोहमारा ते साकोली व पुढे वडसा हा अधिक किमी व वेळ घेणारा मार्ग आहे. शिवाय साकोली-वडसा या मार्गावरील अनेक गावातील घरे ही रस्त्याला लागून आहेत. एकतर या रस्त्यावरील घरे पाडली जातील किंवा गावाबाहेवरुन नवीन मार्ग तयार करावा लागेल. अशी परिस्थीती वडसा-कोहमारा मार्गावरील गावाची नाही.तरी सुध्दा येथे ही राजकारण झाले व साकोली-वडसा या मार्गाला झुकते माप देऊन तिथे रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु झाले आहे. उलटपक्षी कोहमारा-वडसा हा मार्ग मात्र दुर्लक्षितच आहे.