लग्नाच्या शूटिंगसाठी ड्रोन वापरणार असाल तर सावधान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:27 AM2021-07-26T04:27:02+5:302021-07-26T04:27:02+5:30
नरेश रहिले गोंदिया : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण. परंतु लग़्नापूर्वीच प्री-वेडिंग करून लग्नात नवरा-नवरीचे शूटिंग दाखविले ...
नरेश रहिले
गोंदिया : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण. परंतु लग़्नापूर्वीच प्री-वेडिंग करून लग्नात नवरा-नवरीचे शूटिंग दाखविले जाते. लग्नापूर्वीपासून तर लग्नापर्यंत फोटो शूटिंग, व्हिडिओ शूटिंग व ड्रोनच्या माध्यमातून शूटिंग करण्याचे जणू फॅडच तयार झाले आहे. परंतु लग्नात ड्रोनच्या माध्यमातून शूटिंग करत असाल तर सावधान ! या शूटिंगसाठी स्थानिक प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक आहे. अन्यथा आपल्यावर कारवाई होऊ शकते.
लग्न समारंभाची शूटिंग आपल्याला ड्रोनच्या माध्यमातून करायची असेल तर आधी पोलीस प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक आहे. ड्रोनच्या माध्यमातून करण्यात येणारी शूटिंग कधी व किती उंचीवरून करणार आहेत याची इत्थंभूत माहिती पोलिस ठाण्यात द्यावी लागते. विमान व हेलिकॉप्टर यांच्या मार्गावर ड्रोन असेल तर त्या ड्रोनपासून धोका होण्याची दाट शक्यता असते. हा अपघात टाळण्यासाठी पोलिस व विमान प्राधिकरणाकडून परवानगी घेणे आवश्यक आहे. ड्रोनच्या साहाय्याने शूटिंग करण्याचे फॅड तयार झाल्याने प्री-वेडिंगला लोक जुने स्मारक, किल्ले, पहाडी, धरणे व पुरातत्त्व विभागाने बंदी केलेल्या ठिकाणीही लोक जाऊन शूटिंग करताना दिसत आहेत. हे शूटिंग करताना अनेकदा अपघात होतात. हे अपघात टाळण्यासाठी ड्रोन चालविणारा तज्ज्ञ असावा व यासाठी पोलीस ठाण्याची परवानगी घेणे आवश्यक आहे.
..............................
ड्रोन वापरण्यासाठी नियम
१) जुने स्मारक, किल्ले, पहाडी, धरणे व पुरातत्त्व विभागाने बंदी केलेल्या ठिकाणी ड्रोन वापरायचे असेल तर संबंधित विभागाची परवानगी घ्यावी.
२) ड्रोन चालविणारा व्यक्ती अनुभवी व प्रशिक्षिित असावा जेणेकरून अपघात घडणार नाहीत.
३) बसस्थानक, रेल्वेस्थानक व विमानतळावर ड्रोनने शूटिंग करता येणार नाही.
४) विमानतळ असेल अशा ठिकाणी उंचीवरून ड्रोन उडवू नये, अन्यथा विमानाला टक्कर होऊन अपघात होऊ शकतो.
५) शासनाने २५० ग्रॅमपेक्षा कमी वजनाचे ड्रोन असावेत असे नियम काढले आहेत. त्या नियमातच राहून ड्रोनचा वापर करता येईल.
६) ड्राेन चालविताना ड्रोन ज्या रस्त्यावरून फिरविला जात आहे त्या दोन्ही बाजूच्या घरांतील लोकांची ड्रोनकरिता परवानगी घेणे आवश्यक आहे.
...............................
३० हजार रुपये खर्च येतो एका शूटिंगचा
- ड्राेनचा वापर प्री-वेडिंग किंवा लग्नात करायचा असेल तर पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. परवानगी न घेतल्यास कारवाई होऊ शकते.
- ड्रोनद्वारे करण्यात आलेले शूटिंग, एडिटिंग व चित्रफीत तयार करण्यासाठी ३० हजारांच्या घरात खर्च येतो.
- प्री-वेडिंगपासून लग्नसमारंभ आटोपेपर्यंत सर्वांची ड्रोनव्दारे शूटिंग करण्यात येते. ड्रोनचे आकर्षण आता लोकांमध्ये आहे.
................
कोरोनामुळे आमचा व्यवसाय डबघाईस आला आहे. व्हिडिओ शूटिंग आता लग्नामध्ये केली जाते. परंतु कोरोनामुळे गर्दी कमी झाल्याने ड्रोनला सद्यस्थितीत मागणी नाही.
- आनंद पिछोरे, फोटोग्राफर, आमगाव