शाळेत मोबाईल वापरला तर मिळेल टीसी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 12:26 AM2018-02-11T00:26:58+5:302018-02-11T00:29:28+5:30
अलीकडे विद्यार्थ्यांमध्ये मोबाईलचा वापर करण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र बरेच विद्यार्थी मोबाईलचा योग्य वापर करण्याऐवजी त्याचा दुरूपयोगच अधिक करीत आहे. यामुळे काही अप्रिय घटना सुद्धा घडल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : अलीकडे विद्यार्थ्यांमध्ये मोबाईलचा वापर करण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र बरेच विद्यार्थी मोबाईलचा योग्य वापर करण्याऐवजी त्याचा दुरूपयोगच अधिक करीत आहे. यामुळे काही अप्रिय घटना सुद्धा घडल्या आहेत. अशा घटनांना पायबंद लावण्यासाठी शाळेत मोबाईल आणण्यास आणि त्याचा वापर करण्यास जिल्हा परिषद सदस्य रजनी कुंभरे यांनी बंदी घातली आहे. तसेच या नियमाचे उल्लघंन करणाºया विद्यार्थ्याला थेट हातात टिसी (शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र) देण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहे.
आठवडाभरापूर्वी तिरोडा तालुक्यातील सुकडी-डाकराम येथील दोन शालेय विद्यार्थ्यांनी विष प्राशन करुन आत्महत्या केली होती. या घटनेनंतर शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते. सुकडी-डाकराम येथील पालक व गावकऱ्यांनी या घटनेला शिक्षकांना जबाबदार धरुन त्यांच्यावर संताप व्यक्त केला होता. विद्यार्थी शाळेत उपस्थित आहे किंवा नाही याची देखील माहिती शिक्षकांना नसल्याचे सांगत आमचे पाल्य सुरक्षित नसल्याचा आरोप केला होता. यासर्व बाबींची दखल घेत जि.प.सदस्य रंजनी कुंभरे यांनी शाळेला भेट देऊन पालकांनी उपस्थित केलेले मुद्दे योग्य असल्याचे सांगत शिक्षकांना धारेवर धरले. तसेच यापुढे शाळेत मोबाईलचा वापर करण्यास विद्यार्थ्यांना पूर्णपणे बंदी घालण्याचे निर्देश दिले.
या नियमांचे उल्लघंन करणाºयास आधी तंबी व ५०० रुपयांचा दंड आकारण्यास सांगितले. यानंतरही मोबाईलचा वापर करणाºया विद्यार्थ्यांना थेट टीसी देण्याचे निर्देश दिले. शालेय वेळेत विद्यार्थी शाळेत उपस्थित आहेत अथवा नाही याची खात्री करण्यासाठी सकाळी, दुपारी आणि शाळा सुटण्याच्या वेळेत हजेरी घेण्यात यावी. जे विद्यार्थी शाळेत आले नाहीत त्यांची माहिती विद्यार्थ्यांच्या पालकांना त्वरीत द्यावी, शालेय वेळेत विद्यार्थी बाहेर भटकू नयेत यासाठी शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावून ठेवा, मध्यान्ह सुट्टीत विद्यार्थ्यांनी घरी जाण्याऐवजी त्यांनी शाळेतच टिफीन आणावे, प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांवर नजर ठेवण्याची जबाबदारी त्या-त्या वर्गातील वर्गप्रमुख विद्यार्थ्याला द्यावी, एखाद्या विद्यार्थ्याचे वर्तन योग्य नसल्यास त्याची सूचना त्वरीत त्यांच्या पालकांना द्यावी. आदी उपाययोजनाची त्वरीत अंमलबजावणी करण्याचे निर्देश शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांना दिले आहे. या उपाय योजना हळूहळू जि.प.च्या सर्वच शाळेत केल्या जाणार असल्याची माहिती आहे.
दर आठवड्याला होणार पालकसभा
शिक्षक आणि पालक यांच्यात समन्वय राहावे. तसेच पाल्यांसंबंधी काही सूचना असल्यास त्याची माहिती पालकांना देता यावी. यासाठी दर आठवड्याला प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांची पालकसभा घेण्यात येणार आहे.
सूचनांकडे दुर्लक्ष करणाºया शिक्षकांवर कारवाई
विद्यार्थ्यांसंबंधी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी न करणाऱ्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांवर सुद्धा बदलीची कारवाई केली जाणार आहे. यासंबंधीचे लेखी पत्र सुकडी येथील शाळेला दिले असल्याचे जि.प.सदस्य कुंभरे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.