लालपरीत सुरक्षाविषयक बाबींकडे होतेय दुर्लक्ष, अग्निशमन यंत्र गायब !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:29 AM2021-03-05T04:29:23+5:302021-03-05T04:29:23+5:30
गोंदिया : गाव तिथे एसटी जात असल्याने आणि एसटीचा प्रवास हा इतर खासगी प्रवासी वाहनांच्या तुलनेत सुरक्षित आहे. त्यामुळे ...
गोंदिया : गाव तिथे एसटी जात असल्याने आणि एसटीचा प्रवास हा इतर खासगी प्रवासी वाहनांच्या तुलनेत सुरक्षित आहे. त्यामुळे बहुतेक प्रवाशी हे एसटीने प्रवास करण्याला प्राधान्य देतात. तर एसटी महामंडळाकडून सुध्दा प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेतली जात होती. मात्र अलीकडे महामंडळाचे याकडे थोडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. याच अनुषंगाने लोकमत प्रतिनिधीने गुरुवारी (दि.४) येथील बसस्थानकाला भेट देऊन येथे येणाऱ्या काही बसेसची पाहणी केली असता तीन बसेसमध्ये अग्निशमन यंत्रच नव्हते. तर एखाद्या वेळेस किरकोळ अपघात झाल्यास त्वरित उपचार करण्यासाठी प्रत्येक बसमध्ये प्रथमोपचार पेट्या लावल्या जातात. मात्र बहुतेक बसेसमध्ये त्या आढळल्याच नाही. तर काही बसेसमधील प्रथोमपचार पेट्यांची मोडतोड झाली होती. दोन बसेसची आतून पाहणी केली असता चालकाच्या कॅबीनची सुध्दा दुरवस्था झाली असल्याचे आढळले. एकंदरीत लालपरीत प्रवाशांच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्याकडे थोडे दुर्लक्ष होत असल्याचे यासर्व बाबींवरुन आढळले. गोंदिया बसस्थानकावर आलेल्या दोन लांब पल्ल्याचाच बसेसमध्येच अग्निशमन यंत्र गायब दिसले. तर गोंदिया आगाराच्या बसेसमध्ये अग्निशमन यंत्र आणि प्रथमोचार पेट्या सुध्दा दिसून आल्या. केवळ जिल्ह्यातीलच नव्हे तर जिल्हा बाहेरील हजारो प्रवासी दररोज बसने प्रवास करतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एसटी महामंडळाने सुध्दा उपाययोजना करण्याची गरज आहे.
.........
प्रथमोपचार पेट्यांची झाकणेच गायब
एखाद्या वेळेस किरकोळ अपघात झाल्यास त्वरीत उपचार करण्यासाठी प्रत्येक बसमध्ये प्रथमोपचार पेट्या लावण्याला जातात. मात्र बहुतेक बसेसमध्ये त्या आढळल्याच नाही. तर काही बसेसमधील प्रथमोपचार पेट्यांची मोडतोड झाली होती. तर काही पेट्यांची झाकने गायब झाली होती. त्यामुळे त्यातील साहित्याची कल्पना न केेलेलीच बरी.
.....
वाय फाय सुविधा नावालाच
खासगी प्रवाशी वाहतुकीला टक्कर देत प्रवाशांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करुन देत आकर्षीत करण्यासाठी शिवशाही बसेसमध्ये वायफायची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. मात्र अलीकडे ही सुविधाच या बसेसमध्ये काम नसल्याने ही सुविधा सुध्दा नावालाच असल्याचे अतुल भावसार या प्रवाशांने सांगितले.
...........
आगाराच्या प्रवेशव्दारावर चौकशी
शहरातील मरारटोली परिसरात मुख्य बसस्थानक आणि यालाच लागून आहे. आगाराच्या सुरक्षेच्या दृष्टीने चारही बाजुने सुरक्षा भिंतीचे बांधकाम करण्यात आले आहे. तर आगारात प्रवेश करण्यापूर्वीच गेटवर तैनात असल्याने चौकीदाराने थांबवून कुणाला भेटायचे आहे असे विचारुन नाव आणि दुचाकीचा क्रमांक नोंद करुन घेतला.
......
असामाजिक तत्वांचा वावर
गोंदिया बसस्थानकला लगत काही प्रमाणात असामाजिक तत्वांचा वावर आढळून आला. याचा कधी कधी प्रवाशांना सुध्दा त्रास होतो. याची तक्रार सुध्दा आगाराकडून पोलिसांनी केली जात आहे. तर पार्किंग स्थळ निश्चित नसल्याने वाहने अस्ताव्यस्त लावली जात असून त्यांच्या सुरक्षेकरिता सुरक्षा रक्षकाचा सुध्दा अभाव दिसून आला.
...
या बसेसमध्ये नव्हते अग्निशमन यंत्र
बस क्रमांक : एमएच : ३१, ५५४६
बस क्रमांक : एमएच : ३१, ९१६९
बस क्रमांक : एमएच : ३१, ५५६७
..........
कोट :
गोंदिया आगारातील ७८ बसेसमध्ये अग्निशमन यंत्र आणि प्रथमोचार पेट्यांची व्यवस्था आहे. तसेच बसेस आगारातून निघण्यापूर्वी त्यांची तपासणी केली जाते. प्रवाशांना प्रवासदरम्यान कुठलाही त्रास हाेवू नये याची सुध्दा काळजी घेतली जाते. गोंदिया आगारातील सर्व बसेस सुस्थिती आहेत.
-संजना पटले, आगार व्यवस्थापक गोंदिया.
.......