बंद रेल्वे फाटकाखालून दुचाकी काढणाऱ्या 'खतरों के खिलाडीं'नो सावधान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2021 04:48 PM2021-12-03T16:48:40+5:302021-12-03T16:50:02+5:30
रेल्वे फाटक बंद असल्याने अनेक जण त्या खालून आपली वाहने काढतात. परंतु, आता रेल्वे फाटकाच्या आतून दुचाकी काढल्यास थेट गुन्हा दाखल होणार आहे सोबत दुचाकीही जप्त करण्यात येणार आहे.
गोंदिया : जिल्ह्यातील आमगाव तालुक्याच्या किडंगीपार व बाम्हणी रेल्वे फाटकाखालून दुचाकी, सायकल काढणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. मात्र, रेल्वेच्या धडकेत अनेकांचा निष्पाप जीव गेल्याने आता फाटकाखालून वाहन काढणाऱ्यांवर कारवाईचा बडगा रेल्वे प्रशासनाने उगारला आहे. अनेकांवर कारवाई केल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली आहे. त्यामुळे नागरिकांनो सावधान, आता रेल्वे फाटकाखालून दुचाकी काढाल तर थेट गुन्हा दाखल होणार आहे.
गोंदिया जिल्ह्यात अनेक ठिकाणी मानव विरहित रेल्वे फाटक आहेत. या फाटकावर अनेकदा अपघात घडले आहेत. परंतु ज्या ठिकाणच्या रेल्वे फाटकांवर मनुष्यबळ आहेत. त्या ठिकाणची फाटक बंद असताना त्या फाटकातून वाहन काढण्यात येत आहे. या प्रकारामुळे रेल्वेचा अपघात होऊ शकतो हे माहिती असतानाही हा प्रकार सर्रास चालत असतो. परंतु रेल्वे फाटकावर काम करणारे रेल्वेचे कर्मचारी काहीच लक्ष देत नाही. परिणामी अपघाताला आमंत्रण देणारी ही गोष्ट ठरते.
दुचाकी होऊ शकते जप्त
रेल्वे गाडी रुळावरून जाण्याच्या पाच मिनिटाअगोदर फाटक बंद करण्यात येते. परंतु पाच मिनिटेही वाट न बघणारे लोक बंद रेल्वे फाटकातून आपली दुचाकी काढून नेत असतात. यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता रेल्वे फाटकाच्या आतून दुचाकी काढल्यास दुचाकी जप्त करण्यात येणार आहे.
आतापर्यंत अनेकांचा जीव गेला
- रेल्वे फाटक बंद असल्याने अनेक जण त्या खालून आपली वाहने काढतात. अशातच रेल्वेगाडीचा धक्का लागून अनेकांचा निष्पाप जीव गेला आहे.
- अनेकांच्या घरातील कर्ता व्यक्तीच गेल्याने त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले. त्यामुळे लोकांनी जीव धोक्यात घालू नये यासाठी बंद फाटकातून वाहन काढू नये.
आतापर्यंत कारवाई नाही
बंद रेल्वे फाटकातून दुचाकी काढून आपला पुढचा मार्गाक्रमण करण्याचा प्रयत्न अनेक तरुण मंडळी करतात. त्या वाहनाला जप्त केले जाणार आहे किंवा वाहन मालकाला दंड ही केला जाऊ शकतो. परंतु अशा प्रकारची कारवाई गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत करण्यात आली नाही.