पलटूदेव पहाडावर अवैध खोदकाम

By admin | Published: September 25, 2016 02:22 AM2016-09-25T02:22:59+5:302016-09-25T02:22:59+5:30

नवेगावबांध येथील पलटू देवस्थानासमोरील शासकीय पहाडावर मोठ्या प्रमाणात विनापरवागीने अवैध गिट्टी व मुरुम उत्खनन सुरू आहे.

Illegal digging on Paltudew Hill | पलटूदेव पहाडावर अवैध खोदकाम

पलटूदेव पहाडावर अवैध खोदकाम

Next

मुरूम व गिट्टीची चोरी : शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला, तालुका प्रशासन छडा लावणार?
संतोष बुकावन  अर्जुनी-मोरगाव
नवेगावबांध येथील पलटू देवस्थानासमोरील शासकीय पहाडावर मोठ्या प्रमाणात विनापरवागीने अवैध गिट्टी व मुरुम उत्खनन सुरू आहे. पहाडाच्या पायथ्याशी अनेक धनदांडग्यांनी अतिक्रमण करून हा प्रकार राजरोसपणे सुरू आहे. आतापर्यंत सदर खोदकाम करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई झाली नसल्यामुळे लाखो रुपयांची संपदा नष्ट होऊन पर्यावरण व वन्यप्राण्यांना धोका निर्माण झाला आहे. एवढेच नाही तर लाखो रुपयांच्या शासकीय महसुलावरही पाणी सोडले जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, नवेगावबांध येथे पलटू देवस्थानासमोर १२६२/१ हा मोठ्या झाडांचा जंगल असलेला शासकीय गट आहे. याचे क्षेत्रफळ १५५ हेक्टर आर एवढे आहे. लगतच व्याघ्र प्रकल्प आहे. या शासकीय जागेवर गुत्तेदारांचे साम्राज्य आहे. अनेक वर्षापासून अवैध गिट्टी उत्खनन बिनबोभाटपणे सुरु आहे. यामुळे पहाड सर्वत्र पोखरलेला दिसून येतो. कुठलीही परवानगी नसताना या ठिकाणी विविध आकाराच्या गिट्टीचे साठे दिसून येतात.
पहाडीच्या पायथ्याशी काही धनदांडग्यांनी शेती तयार करून अतिक्रमण केले आहे. येथे शेतजमिनीचा उपयोग कमी, मात्र गिट्टी विक्रीचा गोरखधंदा जोरात सुरू असल्याचे दिसून येते. कधीकधी तर या ठिकाणी पाथरवटांचे जत्थेचे जत्थे दिसून येतात. एवढे असतानाही महसूल व वनविभागाचे अधिकारी मात्र मूग गिळून आहेत. यामागे मोठे ‘अर्थकारण’ दडले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नवेगावबांध येथे तलाठी कार्यालय आहे. एवढेच नाही तर वनविभागाच्या सहाय्यक उपवनसंरक्षकाचे कार्यालय आहे. पहाड महसूल विभागाकडे येत असला तरी त्यावरील झाडे मात्र वनविभागाने जतन करण्याची आवश्यकता असताना या दोन्ही यंत्रणांचे त्याकडे दुर्लक्ष आहे.
या पहाडीलगतच नवेगावबांध व्याघ्र प्रकल्प आहे. परिसरात वन्यप्राण्यांचा संचार असतो. मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या गिट्टी उत्खनामुळे त्यांच्या अधिवास व पायथ्यांशी असलेल्या बोडीतील जलप्राशनात बाधा उत्पन्न होते. त्यामुळे प्राणी व्याघ्र प्रकल्प सोडून बाहेर स्थलांतरीत होतात. वास्तविक गिट्टी उत्खनन व शासनाला या पहाडीक्षेत्रात मिळालेला महसूल याची गोळाबेरीज केल्यास लाखो रुपयांचा शासनाचा महसूल बुडाल्याचे निदर्शनास येईल.

झारीतील शुक्राचार्य कोण?
अवैधपणे गिट्टी उत्खनन करुन लाखो रुपयांचा मलिदा खाणारा तो झारीतील शुक्राचार्य कोण? हा प्रश्न कायम आहे. अवैधपणे उत्खनन करुन गिट्टीचा साठा घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात केला आहे. मात्र तो कुणी खोदकाम केले ते पुढे येत नाही. हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरु आहे. तो कुणीतरी गुत्तेदार असावा अशी शंका व्यक्त केली जात आहे. एवढा मोठा प्रताप सुरु असताना स्थानिक प्रशासनाला माहिती असू नये, ही बाब शंकास्पद आहे. पलटूदेव पहाडी ही प्रशासनासाठी भ्रष्टाचाराचे कुरणच झाले आहे. या झारीतल्या शुक्राचार्याचा शोध घेणे महसूल विभागासमोर एक मोठे आव्हान आहे.

-‘ लोकमत’च्या सूचनेनंतर पटवारी-अधिकारीही झाले अवाक्
सदर प्रतिनिधीने शुक्रवारी गुप्त माहितीच्या आधारावर पहाड परिसर पिंजून काढला तेव्हा सारे गौडबंगाल उजेडात आले. त्यानंतर तलाठी झलके यांची भेट घेतली. या शासकीय गटाबद्दलची माहिती जाणून घेतली. तलाठ्यांनी दोन-तीन दिवसापुर्वीच या परिसराला भेट दिल्याचे सांगितले. असा कुठलाही प्रकार नसल्याचे सांगून ते मोकळे झाले. मात्र सदर प्रतिनिधीने त्यांना घटनास्थळावर नेऊन गिट्टीचे साठे दाखविताच त्यांनी डोक्यावर हात ठेवला व तहसीलदार प्रशांत घोरुडे यांना भ्रमणध्वनीवर याची माहिती दिली. त्यांनी अवैध गिट्टी साठ्याचा पंचनामा करुन जप्त करण्याचे फर्मान सोडले.
हितचिंतक की शत्रू!
पलटूदेव पहाडीच्या पायथ्याशी काही धनदांडग्या राजकारण्यांनी अतिक्रमण केले आहे. तिथे शेती काढली. या शेतीत जेमतेम उत्पन्न येते. मात्र खरे उत्पन्न गिट्टीचे आहे. वन्यप्राण्यांना धोका पोहोचेल यासाठी राष्ट्रीय महामार्गाला विरोध केला. म्युझिकल फाऊंटेनच्या आवाजाने व्याघ्र प्रकल्पात वन्यप्राण्यांना त्रास होईल यासाठी नवेगावबांध उद्यान परिसरात आडकाठी आणण्याचे काम केले जात आहे. पहाडावर असलेल्या वन्यप्राण्यांचे पाणवठे अतिक्रमण करुन नष्ट करण्याचे काम हीच मंडळी करीत आहे. त्यामुळे ते व्याघ्र प्रकल्पाचे हितचिंतक की शत्रू? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
वर्षभरापासून गिट्टी बाहेर?
विशेष उल्लेखनीय म्हणजे हा गिट्टीसाठा कुणी केला त्याचे नाव पुढे आले नाही. त्या परिसरात असलेल्या काही लोकांनी बोंडे येथील एका इसमाने गुरुवारी (२०) दुपारपर्यंत पाथरवटांमार्फत गिट्टी काढणे व फोडण्याचे काम केल्याचे सांगितले. हा प्रकार वर्षभरापासून बिनबोभाटपणे सुरु असल्याने लाखो रुपयांची गिट्टी बाहेर गेली आहे. या गोरखधंद्यामुळे पहाड क्षेत्रात मोठमोठे खड्डे पडले आहेत. पहाडावरुन येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहासोबत माती सुद्धा खचत असल्याने मोठे नुकसान संभवते. पलटू देवस्थानासमोरुन जाणारा पांदण रस्ता सुद्धा
गिट्टी तस्करांनी सोडला नाही. अगदी रस्त्याच्या कडेपासून उत्खनन झाल्याचे दृष्टीस येते.
अधिक गिट्टी उत्खननामुळे काही झाडांची मुळे
मुरल्याने ते कधीही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: Illegal digging on Paltudew Hill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.