सागवान वृक्षाची अवैध कत्तल, वन विभागाचा पांघरूण घालण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:19 AM2021-07-22T04:19:19+5:302021-07-22T04:19:19+5:30

नवेगावबांध : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या एका खसऱ्यातील ३२ सागवान झाडांची परस्पर कटाई करून त्यांची विल्हेवाट लावल्याचा ...

Illegal felling of teak tree, attempt to cover forest department | सागवान वृक्षाची अवैध कत्तल, वन विभागाचा पांघरूण घालण्याचा प्रयत्न

सागवान वृक्षाची अवैध कत्तल, वन विभागाचा पांघरूण घालण्याचा प्रयत्न

Next

नवेगावबांध : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या एका खसऱ्यातील ३२ सागवान झाडांची परस्पर कटाई करून त्यांची विल्हेवाट लावल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. हे प्रकरण अंगावर येऊ नये म्हणून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी थातूरमातूर चौकशी करून कटाई केलेले सागवान जप्त केल्याची माहिती आहे; पण ज्या ट्रॅक्टरने या सागवान लाकडाची विल्हेवाट लावण्यात आली, तो अद्यापही जप्त करण्यात आलेला नाही.

गोठणगाव वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या सहवनक्षेत्र कार्यालय, केशोरी, परसटोला कंपार्टमेंट क्रमांक ८५७, ८५८ मधील गट नंबर ४६ मधील सरकारी वनजमिनीवरील सागवान झाडे अवैधपणे कापण्यात आली आहेत. परसटोला येथील एका शेतकऱ्याच्या ८.५७ हेक्टर आर. क्षेत्रापैकी त्यांना ३.३२ हेक्टर आर. क्षेत्राचा पट्टा शासनाकडून मिळाला आहे. जरी पट्टा मिळाला असला तरी त्या जमिनीवर वृक्षांची कटाई करता येत नाही. मात्र हे नियम धाब्यावर बसवून जवळपास ३२ सागवान वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल केल्याची बाब वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रकरणाची चर्चा सुरू झाल्यानंतर १० जून २०२१ रोजी चौकशी करीत ते सागवान लाकूड जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. पण ज्या ट्रॅक्टरने कत्तल केलेल्या सागवान वृक्षांची वाहतूक करण्यात आली, तो ट्रॅक्टर अद्यापही जप्त करण्यात आलेला नाही. त्यामुळे या प्रकरणावर वन विभागाकडून पांघरूण घातले जात असल्याची असल्याची चर्चा आहे. गोठणगाव वन परिक्षेत्राचे अधिकारी व्ही. बी. तेलंग यांना याबाबत विचारले असता वृक्षतोड ही अवैध असून ती लाकडे खासगी ट्रॅक्टरद्वारे नवेगावबांध येथील लाकूड आगारात जमा करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Illegal felling of teak tree, attempt to cover forest department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.