तंटामुक्त गाव मोहिमेमुळे अवैध दारूविक्रेत्यांना लगाम
By admin | Published: October 13, 2016 01:59 AM2016-10-13T01:59:35+5:302016-10-13T01:59:35+5:30
गावातील अवैध दारूमुळे गावाचे वातावरण दूषित होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाच्या गृहनिर्माण विभागाने एक आदेश काढून गावागावांत ...
भट्ट्यांना बसतोय आळा : अवैध दारूमुळे गावाचे वातावरण झाले होते दूषित
गोंदिया : गावातील अवैध दारूमुळे गावाचे वातावरण दूषित होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाच्या गृहनिर्माण विभागाने एक आदेश काढून गावागावांत चालणाऱ्या अवैध दारू विक्रेत्यांच्या भट्ट्या बंद पाडून त्यांना पर्यायी रोजगाराकडे वळवावे, असे सांगितले. त्यानुसार जिल्ह्यातील ५५१ तंटामुक्त गाव समित्यांनी जिल्ह्यातील हजारो अवैध दारू विक्रेत्यांची दुकाने बंद पाडली. कालांतराने सुरू होणाऱ्या या दारू विक्रेत्यांना आता तुरुंगात डांबण्याची मोहीम सुरू केल्याने त्या दारू विक्रेत्याची माहिती पोलिसांना पुरुवण्यासाठी तंटामुक्त गाव मोहीम सक्रीय झाली आहे.
गावातील अवैध दारूमुळे वाढणारे तंटे सोडविणे महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीला जड जात होते. हे पाहून महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने क्रमांक एम. आय. एस.१००७ /सी.आर.२३८ /पोल-८ दि. १९ जुलै २००७ व शासन निर्णय गृहविभाग एम. आय. एस.१००८/ सी.आर.४३/२००८ पोल-८ दि.१४ आॅगस्ट २००८ व वी.स.आ.१००८ /६६९/ प्र.क्र.८१ /0८ पोल-मंत्रालय मुंबई अनुसार २४ नोव्हेंबर २००८ रोजी अवैध धंद्यांना प्रतिबंध घालणे व त्याचे निर्मूलन करण्यासाठी निर्णय काढला. या निर्णयामुळे गावागावांत अवैध दारू विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर गदा आली. परंतु त्या विक्रेत्यांना पर्यायी रोजगाराकडे वळविण्याचे कामही महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांनी केले.
या अवैध दारूतून गावाचे वातावरण दूषित होऊन भांडणे होत होती. यामुळे आर्थिक नुकसानी बरोबर कुटुंबाची व समाजाची शांतता धोक्यात येत होती. त्या दृष्टीने गावात तंटे होणार नाही यासाठी अवैध दारूवर आळा घालण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीने पोलिसांची मदत घेऊन आपल्या गावातील अवैध दारूविक्री बंद पाडली. प्रत्येक गावात मोहफुलांपासून दारू काढणाऱ्या भट्या बंद पाडल्या.
गोंदिया जिल्ह्यातील जवळजवळ दीड हजार दारूभट्ट्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांनी बंद पाडल्या. या अवैध दारूविक्रीवर जे कुटुंब चालत होते, अशा कुटुंबांतील सदस्यांना समाजात सन्मानाने जगण्याची शिकवण देऊन त्यांना पर्यायी रोजगाराकडे वळविले.
तंटामुक्त गाव समितीच्या या उपक्रमामुळे दररोज सायंकाळी होणारे तंटे शांत झाले. गावाचे वातावरण शांततेकडे वळू लागले. आता या समित्यांनी जुगाराच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. गावातील चौकाचौकांत किंवा अनेकांच्या घरी खेळले जाणारे जुगार त्यांच्या कुटुंबांना उघड्यावर आणते. त्यांच्यात कामाबद्दल उदासीनता वाढून काही न करता पैसे मिळावे, अशी धारणा निर्माण होते. म्हणून या जुगार अड्ड्यांवर महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे कार्यकर्ते पोलिसांसोबत धाड घालून जुगार खेळणे बंद करणार आहेत.
महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या कार्यकर्त्यांच्या सक्रियेतेमुळे अनेक गावांतील अवैध दारूभट्ट्या बंद झाल्या आहेत. परंतु अनेक दारूभट्ट्या लपूनछपून अजूनही सुरू आहेत. काही गावांत पोलिसांच्या आशीर्वादाने अवैध दारूविक्री जोमाने सुरू आहे. या अवैध दारूवर आळा घालण्यासाठी व तंटामुक्त गाव मोहीम यशस्वीरीत्या राबविण्यासाठी पोलिसांनी समित्यांना सहकार्य करावे, अशी मागणी समित्यांचे कार्यकर्ते करीत आहेत.(तालुका प्रतिनिधी)