निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर अवैध दारु विक्रीला आला आहे ऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2024 04:52 PM2024-11-08T16:52:01+5:302024-11-08T16:54:17+5:30
राज्य उत्पादन शुल्क विभाग सुस्त : पोलिस विभागाकडून सातत्याने कारवाया
लोकमत न्यूज नेटवर्क
गोदिया : कोणतीही निवडणूक म्हटले की, दारू, पार्ष्या व पैशांचा महापूर राहतो. त्याच्या पूर्ततेसाठी परवानाप्राप्त दारूऐवजी गावठी, हातभट्टीच्या दारूवर अधिक भर दिला जातो. २० नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात, गावखेड्यात, दुर्गम भागात गावठी दारूच्या भट्टया पेटल्या आहेत. या भट्टया विझविण्याचे आव्हान राज्य उत्पादन शुल्क (एक्साईज) विभागापुढे आहे.
नुकताच पावसाळा संपल्याने सर्वच नदी-नाल्यांना पाणी आहे. याच नदी नाल्यांच्या काठावर व आश्रयाने गावठी हातभट्टीच्या दारूच्या भट्टया पेटविल्या जात आहेत. खास निवडणुकीत मतदारांना, कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी ही दारू काढली जात असून, चोरट्या मार्गाने त्याचा पुरवठा होणार आहे. दाट जंगलाचा आश्रय घेऊन या भट्टया पेटविल्या गेल्याने सहसा कोणाच्या दृष्टीस पडत नाहीत.
या अवैध दारूविक्रीला ब्रेक लावून परवानाप्राप्त दारूची अधिकाधिक विक्री करण्याची जबाबदारी कायद्याने राज्य उत्पादन शुल्क विभागावर सोपविली आहे. मात्र या विभागाकडून कारवाया केल्या जात असल्याचे ऐकिवात नाही. उलट पोलिस विभागाकडून मात्र दररोज अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाया केल्या जात असल्याचे कारवायांतून दिसून येत आहे.
निवडणूक काळात तरी 'मिनी बार' बंद होईल का ?
- शहरात परवानाप्राप्त देशी-विदेशी, वाइन बार, बिअर शॉपी आहेत. नियमानुसार या शॉपमधून पॅक दारू। घेऊन जाणे एवढेच अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी या शॉपच्या आजूबाजूलाच दारू पिण्याची छुपी व्यवस्था केलेली असते.
- त्यासाठी डिस्पोजल ग्लास, चकनासुद्धा उपलब्ध करून दिला जातो. शहरातील ऑम्लेटच्या गाड्यांवर सर्रास अवैधरीत्या दारू विकली जाते.
- अनेक ठिकाणी तर पोलिस ठाण्यासमोर आणि पोलिसांच्या नाकावर टिच्चून राजरोसपणे हे मिनी बार सुरू असतात. निवडणूक काळात एक्साइज, पोलिस व प्रशासकीय यंत्रणा अलर्ट असते. रात्री लवकरच नाकाबंदी सुरू होते. किमान या काळात तरी शहरच नव्हे तर ग्रामीण भागात सर्वदूर पसरलेले हे मिनी बार बंद होणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दररोज होत आहेत कारवाया
सध्या पोलिस विभागाकडून दररोज अवैध दारू विक्रेत्यांना दणका दिला जात आहे. त्यातही आता निवडणूक बघता दारू गाळण्यासाठी अवैध दारू विक्रेत्यांनी साठवून ठेवलेले मोहफुल व दारू पोलिसांकडून जप्त करून नष्ट केले जात आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने या कारवाया करणे अपेक्षित असताना मात्र आपला बंदोबस्त सांभाळून पोलिसांना आता अवैध दारू विक्रेत्यांच्या मुसळ्या आवळण्यासाठी कारवाया कराव्या लागत असल्याचे चित्र आहे