नवरात्रौत्सवात महिलांचा दुर्गावतार ! चाकू उगारणाऱ्या दारू विक्रेत्याला महिलांनी दिला चोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2021 06:10 PM2021-10-12T18:10:54+5:302021-10-13T15:38:22+5:30
गावात दारूबंदी असतानाही अवैध दारूविक्री करणाऱ्या विक्रेत्याला जाब विचारायला गेलेल्या महिलांवर त्यात दारू विक्रेत्याने चाकू उगारला असता महिलांनी दारू विक्रेत्याला चांगलाच चोप दिल्याची घटना गोरेगाव तालुक्यातील डव्वा या गावात घडली आहे.
गोंदिया : नवरात्रौत्सवात (Navratri) महिलांचा दुर्गावता पहायला मिळाला आहे. गोरेगाव तालुक्यातील डव्वा गावात दारू बंदी असतांना अवैध दारू विक्री करणाऱ्या विक्रेत्याला जाब विचारायला गेलेल्या महिलांवर दारू विक्रेत्याने चाकू उगारला. यानंतर संतप्त झालेल्या महिलांनी दारू विक्रेत्याला चांगला चोप दिला.
गावात दारूच्या आहारी जाऊन अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. हेच लक्षात घेत डव्वा येथे महिलांनी दारू बंदी समिति स्थापन करून दारु विक्रिस विरोध करण्यास सुरुवात केली आहे. या समितिला डव्वा येथील बसस्टॉपच्या मागे अवैध दारू विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर गावातील महिला घटनास्थळी दाखल झाल्या. यावेळी महिलांनी दारू विक्रेत्याला जाब विचारला असता दारू विक्रेत्यानी चाकू काढत शस्त्र दाखवून धाक दाखवायचा प्रयत्न केला.
मात्र, चाकूच्या धाकाला महिला अजिबात घाबरल्या नाहीत व त्यांनी दारू विक्रेत्याला धू धू धुतले. महिलांच्या अंगात जणु दुर्गा सरसावली असल्याचे दिसून आले आणि महिलांनी त्या दारू विक्रेत्याला चांगला चोप देत हुसकावून लावले. या घटने प्रकरणी गोंदिया ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये दारू विक्रेत्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.