पलटू पहाडीवर गिट्टीचे अवैध खनन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 12:35 AM2018-02-11T00:35:44+5:302018-02-11T00:35:58+5:30

येथील पलटू पहाडीवर मागील काही महिन्यांपासून गिट्टीचे अवैधपणे खनन सुरु आहे. महसूल व वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष असल्याने लाखो रुपयांची वनसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. सदर पहाडीवर मोठ्या वृक्षांचे जंगल आहे.

Illegal mining of ballast in Paltu hill | पलटू पहाडीवर गिट्टीचे अवैध खनन

पलटू पहाडीवर गिट्टीचे अवैध खनन

Next
ठळक मुद्देगावकऱ्यांची कारवाईची मागणी : परवाना एका जागेचा, खनन दुसऱ्या जागेतून

लोकमत न्यूज नेटवर्क
नवेगावबांध : येथील पलटू पहाडीवर मागील काही महिन्यांपासून गिट्टीचे अवैधपणे खनन सुरु आहे. महसूल व वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष असल्याने लाखो रुपयांची वनसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. सदर पहाडीवर मोठ्या वृक्षांचे जंगल आहे. त्यामुळे वृक्षसंपदा ही नष्ट होत असल्याची बाब उघडकीस आली आहे. वनाचे संवर्धन आणि अवैध खनन थांबविण्यासाठी स्थानिक गावकऱ्यांनी याबाबत तक्रार केली. मात्र संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी अवैध खनन करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी गावकºयांनाच आपसांत समझोता करण्याचा सल्ला दिल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
एका गट क्रमांकाचा परवाना घेवून दुसऱ्या गट क्रमांकातून अवैध खनन करण्याचा येथे गोरखधंदा सुरु असल्याची बाब देखील पुढे आली आहे. संबंधित कंत्राटदारावर कारवाई करुन अवैध खनन थांबविण्याची मागणी नवेगावबांध येथील नागरिकांनी केली आहे.
येथील पलटू पहाडीवरील गट क्र. १२२३ मधून गिट्टी खनन करण्याचा परवाना कंंत्राटदाराने घेतला. परंतु त्यांनी गट क्रमांक १२२३ मधून गिट्टी (बोल्डर) खनन न करता गट क्र. १२६२/१ या शासकीय जागेतून आराजी १५५.७६ हेक्टर आर पैकी १ हेक्टर मधून अवैधरित्या खनन केले आहे. हा प्रकार मागील काही महिन्यांपासून सुरु आहे. सदर प्र्रकार गावकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी महसूल विभागाचे प्रभारी तहसीलदार भंडारी यांना तक्रार केली. त्यांनी ३१ जानेवारी रोजी प्रत्यक्ष घटनास्थळावर भेट दिली व सदर अवैध खनन प्रकाराची पाहणी केली. यावेळी सरपंच अनिरुद्ध शहारे, संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामदास बोरकर, सतिश कोसरकर, बाबुराव नेवारे, प्रकाश तरोणे, अहमद सय्यद, वरक्षक भोयर उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला.
कंत्राटदाराला १२२३ गट क्रमांकाचा गिट्टी खननाचा परवाना असून लगतच्या १२६२/१ या गट क्रमांकात अवैध खनन केल्याची बाब निदर्शनास आली. पंचनाम्यात २० ब्रास गिट्टी असल्याचे निदर्शनास आले. मात्र कंत्राटदारावर कारवाई करण्याचे सोडून गावपातळीवर समझोता करण्याचा सल्ला अधिकाऱ्यांनी दिल्याचा आरोप आहे. तहसीलदार हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
वनसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावर
गट क्रमांक १२६२/१ हे मोठ्या वृक्षांचे जंगल आहे. यावर गावकऱ्यांचा निस्तार हक्क आहे. या अवैध खननाबरोबरच मोठ्या वृक्षांचे नुकसान होत असल्याने मौल्यवान वनसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. काही वृक्षांच्या मुळांना खननादरम्यान धक्का बसून त्यांचे नुकसान होत आहे. यामुळे या भागातील वृक्ष देखील समूळ वाळत आहे. यावर वन विभागाची देखरेख असते. याबाबत उत्तर वनविभागाचे वनरक्षक भोयर यांना विचारणा केली असता त्यांनी काही माहिती नसल्याचे सांगितले. गावच्या नैसर्गिक संपत्तीची लूट होत असल्याने गावकऱ्यांमध्ये रोष व्याप्त आहे.

Web Title: Illegal mining of ballast in Paltu hill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.