कनेरी तलावात अवैध मुरुम उत्खनन
By admin | Published: July 26, 2014 02:21 AM2014-07-26T02:21:52+5:302014-07-26T02:21:52+5:30
तहसील कार्यालयातून रॉयल्टी न घेता कनेरी/केशोरी येथील
पुर्नचौकशी होणार : अर्जुनीच्या तहसीलदारांनी घेतली दखल
अर्जुनी/मोरगाव : तहसील कार्यालयातून रॉयल्टी न घेता कनेरी/केशोरी येथील तलावातून हजारो ब्रास अवैध मुरुम काढण्यात आल्याचे वृत्त आहे. या मुरुमाचा पुरवठा दिनकरनगर ग्रामपंचायत व केशोरी येथील गरजू ग्रामस्थांना करण्यात आल्याचे समजते. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, तुकुमनारायण येथील गट नं.१२५ मधील ५० ब्रास मुरुमाची रॉयल्टी स्थानिक तहसील कार्यालयातून काढण्यात आली. ही रॉयल्टी एका बड्या कंत्राटदाराने आपल्या हाताखाली काम करणाऱ्या इसमाच्या नावाने काढली. या रॉयल्टीची मुदत ८ ते १६ जुलै या कालावधीसाठी होती. या ठिकाणी काही ब्रास मुरुमाचे उत्खनन करण्यात आले.
मात्र रॉयल्टी नसतानाही कनेरी तलाव गट नं. १३७ मधून मोठ्या प्रमाणावर अवैध मुरुमाचे उत्खनन करण्यात आले.
हे उत्खनन ८ ते १२ जुलैपर्यंत जेसीबी मशीन लावून करण्यात आले. सुमारे १० ते १५ ट्रॅक्टरद्वारे या अवैध मुरुमाचा पुष्पनगर अ व ब व दिनकरनगर ग्रामपंचायत तसेच केशोरी येथील खासगी ग्राहकांना पुरवठा करण्यात आला. याद्वारे लाखो रुपयांची कमाई करण्यात आल्याचे समजते. या अवैध खोदकामामुळे तलावात मोठे खड्डे पडल्याचे दिसते.
यासंदर्भात तहसीलदार संतोष महाले यांच्याशी चर्चा केली असता या प्रकरणाची तक्रार भ्रमणध्वनीद्वारे प्राप्त झाली. तलाठ्याकडून चौकशी अहवाल मागीतला आहे. चौकशी अहवाल शंकास्पद असल्याने पूनर्चौकशीचे आदेश देण्यात आले. दोषी कर्मचारी व संबंधित कंत्राटदाराची गय केली जाणार नाही. यासंदर्भात स्वत: चौकशी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)