इडियाडोह बुडीत क्षेत्रात टरबुजाची अवैध लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 09:48 PM2018-03-25T21:48:51+5:302018-03-25T21:48:51+5:30
इटियाडोह पाटबंधारे व्यवस्थापनांतर्गत येणाऱ्या झाशीनगर नजीकच्या बुडीत क्षेत्रातील शेकडो एकर जमिनीवर परप्रांतीय इसमांनी टरबूजची अवैध लाागवड केली आहे.
संतोष बुकावन।
आॅनलाईन लोकमत
अर्जुनी-मोरगाव : इटियाडोह पाटबंधारे व्यवस्थापनांतर्गत येणाऱ्या झाशीनगर नजीकच्या बुडीत क्षेत्रातील शेकडो एकर जमिनीवर परप्रांतीय इसमांनी टरबूजची अवैध लाागवड केली आहे. याद्वारे दररोज लाखो रुपयांच्या टरबूजची विक्री केली जात आहे. यात संबंधितांचे हात ओले झाले असल्याच्या चर्चेला ऊत आले आहे.
प्राप्त माहितीनुसार इटियाडोह हे जिल्ह्यातील मोठे धरण आहे. या धरणाचा बुडीत क्षेत्र खूप लांब अंतरापर्यंत परसलेले आहे. झाशीनगर परिसरातील शेकडो एकर जमिनीवर परप्रांतीय व्यावसायीकांनी रामनगर या वसाहतीतील एका इसमाला हाताशी धरुन त्याठिकाणी डिसेंबर महिन्यात टरबूज लागवड केली. या टरबूज शेतीला धरणातीलच पाण्याचा सर्रास वापर केला जात आहे. एकीकडे पाणी टंचाईचे चित्र निर्माण करुन जिल्हा प्रशासन स्थानिक शेतकºयांना पीक लागवडीसाठी मनाई करते तर दुसरीकडे या पद्धतीने पाण्याचा चक्क अवैधरित्या वापर केला जात आहे. या टरबूज लागवडीसाठी व्यासायीकांनी कुठल्याही यंत्रणेची परवानगी घेतली नसल्याची माहिती आहे. छत्तीसगड राज्याच्या पखांजूर या बंगाली वसाहतीतील एक इसम महाराष्टÑातील अशा जमीनी शोधून त्या ठिकाणी टरबूज लागवडीचा गेल्या अनेक वर्षापासून व्यवसाय करतो. त्याचे असे अनेक प्रकल्प गडचिरोली जिल्ह्यात आहेत. त्याने यासाठी तालुक्यातील एका स्थानिक इसमाला हाताशी धरले. त्यांची नजर इटियाडोह धरणाच्या बुडीत क्षेत्रावर पडली. एरव्ही ते पाण्याच्या नजीक असलेल्या जमीनीचे एकरी १० हजार रुपये देऊन ती जमीन भाड्याने घेतात व त्यावर टरबूजाची लागवड करतात. येथे त्यांनी शक्कल लढविली व इटियाडोह धरणाच्या बुडीत क्षेत्रात सुमारे ३० हेक्टर जागेत टरबूजाची अवैध लागवड केली. यासाठी ते ट्रॅक्टरसह पाण्याची टाकी व डिझल पंपाद्वारे धरणातील पाण्याचा गैरवापर करतात. यासाठी त्यांनी पुणे पीक पॅटर्न राबवून टरबूजाची लागवड केली आहे. टरबूज लागवडीच्या ठिकाणी पाणी पुरवठ्यासाठी त्यांनी पद्धतशीर ड्रिप योजनेचा वापर केला. सर्व काही शासनाचे मात्र पैसा कमावण्याचा हा गोरखधंदा सुरु आहे. या बुडीत क्षेत्राच्या ठिकाणी वाहतूक व्हावी यासाठी पद्धतशीरपणे रस्ते तयार करण्यात आले आहेत. याचा काही भाग वनविभागाच्या अखत्यारीत येतो.
झाशीनगर या गावातून थेट मोठे ट्रक या बुडीत क्षेत्रात पोहोचतात. प्रतिनिधीने या ठिकाणी भेट दिली तेव्हा या बुडीत क्षेत्रात टरबूजाची लागवड केलेल्या ठिकाणी एक दोन नव्हे तर तब्बल सहा ट्रक उभे होते. एका ट्रकमध्ये साधारणत: १६ टन टरबूज जातो. दिवसभरात सााधरणत: १० ट्रक माल बाहेर जातो. यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता या गुत्तेदारांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली.
देश-विदेशात पाठविले जाते टरबूज
येथील टरबूज दिल्ली, छत्तीसगड, राजस्थान, कोलकत्ता या ठिकाणी जातो. हाच टरबूज दुबई येथे पाठविला जात असल्याची माहिती आहे. हे गुत्तेदार इटियाडोह पाटबंधारे व्यवस्थापक उपविभागातील अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळ झोकून दररोज लाखो रुपयांची उलाढाल करीत आहेत. त्यांच्या कार्यक्षेत्रात डिसेंबर महिन्यापासून हा गोरखधंदा सुरु असून तसेच याची कुजबूज पंचक्रोशीत असतांनाही या विभागातील अधिकाऱ्यांना माहिती असू नये याचे नवल वाटते.
शेतकऱ्यांना नकार, व्यावसायिकांना होकार
सध्या उन्हाळा सुरु झाला आहे. पिण्याचे पाणी व गुराढोरांना पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. अशा परिस्थितीत इटियाडोह कालव्याला पाणी सोडण्याची या अधिकाऱ्यांना मागणी केली तर ते चक्क नकार देतात. मग एवढी हिम्मत करुन हा गोरखधंदा कसा काय सुरु आहे? अधिकाऱ्यांच्या विनासंमतीने हे शक्य आहे काय? याविषयी परिसरात तर्कवितर्क लावले जात आहेत. हा अवैध व्यवसाय करणाऱ्या व्यासायीकांनी स्थानिक लोकांना हाताशी घेतले. यापैकी झाशीनगर गावातील अनेक रहिवासी तेथे जाऊन तृप्त होतात. त्यामुळेच याची पाहिजे तेवढी वाच्यता बाहेर होत नसल्याच्या चर्चा आहेत.
धरण व धरणाच्या बुडीत क्षेत्रात अशी शेती करता येत नाही. हा एकप्रकारे धरणाच्या पाण्याचा गैरवापर आहे. याबाबत मला कसलीच माहिती नाही. मी गोठणगावच्या शाखा अभियंत्यांना चौकशी करण्यासाठी पाठवितो. हे क्षेत्र नेमके वनविभाग की पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित येते याची शहानिशा केली जाईल. जंगली प्राण्यांना येण्या-जाण्यासाठी बाधा उत्पन्न होवू नये असे वनविभागाने सुचविल्यानंतर २०१५ पासून अशा पीक लागवडीसाठी परवानगीच दिली जात नाही. असा प्रकार घडला असल्यास संबंधिताकडून त्याची आकारणी केली जाईल व त्यांना नोटीस देण्यात येईल.
-भिवगडे
उपविभागीयत अभियंता
इटियाडोह पाटबंधारे व्यवस्थापक अर्जुनी-मोरगाव