अवैध प्रवासी वाहतूक एसटीच्या मानगुटीवर
By admin | Published: April 17, 2016 01:39 AM2016-04-17T01:39:05+5:302016-04-17T01:39:05+5:30
केशोरी-नवेगाव (बांध) या मार्गावरील टाईमबार झालेल्या काळी-पिवळी टॅक्सी विना परवाना अवैध प्रवासी वाहतूक करीत असल्यामुळे ....
परिवहन महामंडळाला लाखोंचा फटका: प्रवाशांचा जीव धोक्यात
केशोरी : केशोरी-नवेगाव (बांध) या मार्गावरील टाईमबार झालेल्या काळी-पिवळी टॅक्सी विना परवाना अवैध प्रवासी वाहतूक करीत असल्यामुळे राज्य परिवहन मंडळाच्या साकोली आगाराला लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. या प्रकरणास काही प्रमाणात राज्य परिवहन मंडळ आणि पोलीस यंत्रणा कारणीभूत असल्याचे बोलल्या जाते.
केशोरी- नवेगावबांध या मार्गावर चालणाऱ्या टाईमबार झालेल्या काळी-पिवळी जीप गाड्या प्रवाशांना कोंबून बिनधास्त चालत आहेत. परिवहन मंडळाच्या बसेस मात्र विना प्रवासी खाली जात असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे परिवहन मंडळाला लाखो रुपयांचा फटका बसत आहे. परवानाधारक जिपगाड्यांनी वाहतुकीच्या परवान्यानुसार प्रवासी भरुन नेले तरी एसटीच्या उत्पन्नावर फारसा फरक पडणार नाही. परंतु विना परवाना जिप गाड्या सुद्धा प्रवासी जेवढे मिळतील तेवढे कोंबून भरुन नेताना दिसत आहेत.
परिणामी राज्य परिवहन मंडळाच्या उत्पन्नावर निश्चितच फरक पडत आहे. मात्र या गंभीर बाबीकडे परिवहन मंडळातील वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस यंत्रणा दुर्लक्ष करीत आहे. यावर पोलीस विभाग निर्बंध घालू शकतो. परंतु चिरीमिरीच्या लालसेपोटी अवैध प्रवासी वाहतुकीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. अवैध वाहतुकीच्या प्रवासाला बळी पडून प्रवासी वेळेअगोदर पोहोचण्याच्या घाईमुळे काळी-पिवळी गाड्यांतून प्रवास करुन जीव धोक्यात टाकत आहेत. मात्र या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे परिवहन मंडळाला लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. याकडे पोलीस विभागाने लक्ष दिले तर परिवहन मंडळाच्या उत्पन्नात निश्चितच भर पडल्याशिवाय राहणार नाही. (वार्ताहर)