अवैध प्रवासी वाहतुकीला अभय
By admin | Published: September 10, 2014 11:46 PM2014-09-10T23:46:43+5:302014-09-10T23:46:43+5:30
जिल्ह्यातील राज्य मार्गावर पोलीस विभागातील वाहतूक नियंत्रक विभागाच्या कार्यप्रणालीने दुचाकीस्वारांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. दुचाकीस्वारांना कागदपत्रांची मागणी करून
दुचाकी चालकांचीच तपासणी : वाहतूक नियंत्रण विभागाचा अजब कारभार
आमगाव : जिल्ह्यातील राज्य मार्गावर पोलीस विभागातील वाहतूक नियंत्रक विभागाच्या कार्यप्रणालीने दुचाकीस्वारांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. दुचाकीस्वारांना कागदपत्रांची मागणी करून त्रास दिला जात असताना दुसरीकडे अवैध प्रवासी वाहतुकीला संरक्षण देण्यात येत असल्याचे चित्र आमगावसह इतर मार्गावर दिसून येत आहे.
गोंदिया-आमगाव राज्य मार्ग कोहमारा, देवरी, आमगाव या मार्गावर पोलीस विभागातील वाहतूक नियंत्रण पथकाद्वारे दुचाकी वाहनांची तपासणी मोहीम जोरात सुरू आहे. वाहनधारकांना विविध आवश्यक कागदपत्रांची मागणी या पथकाद्वारे करण्यात येत आहे. परंतु पुराव्यासाठी लागणाऱ्या अनेक कागदपत्रांची सत्यप्रत असूनसुद्धा दुसरा पुरावा सादर करण्यास वाहनधारकांना सांगण्यात येत आहे. वेगळा पुरावा नसल्यावर स्पॉट चालान करण्याची ताकीद दिली जाते. त्यामुळे अनेक वाहनधारक याला बळी पडत आहेत. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहज करावा लागत आहे.
या मार्गावर अनेक वाहतूक नियंत्रक अधिकारी-कर्मचारी चालान करण्याची सक्ती करून अधिक पैशाची मागणी करतात अशा तक्रारी वाढत आहेत. वाहतूक अधिकाऱ्यांची सक्ती टाळण्यासाठी हातावर मोजा व पुढे जा, अशा कानमंत्रामुळे वाहनधारकांची वाहतूक कर्मचाऱ्यांकडून लूट होताना दिसत आहे.
आमगाव गोंदिया, गोरेगाव, देवरी या राज्य मार्गावर अनेक वाहनांची अवैध प्रवासी वाहतुक सर्रासपणे सुरु आहे. काळीपिवळी, टाटा मॅजीक व तीन चाकी आॅटो या वाहनांची अवस्था पाहिली तर प्रवाश्यांसाठी हा प्रवास जीवघेणा असतो. अनेक वाहनांमध्ये पायदान तर मागील भागाच्या दारापर्यंत उभे करुन प्रवास सुरु आहे. परंतु वाहतूक नियंत्रक कर्मचारी या जीवघेण्या प्रवासाला आळा घालण्यासाठी पुढाकार घेत नाही. त्यामुळे प्रवासी वाहतुकीची साधने उपलब्ध नसल्याने नाईलाजाने प्रवाशांना त्यातून प्रवास करावा लागतो. या अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्याऐवजी वाहतूक विभागातील कर्मचारी दुचाकी वाहनधारकांकडून चलान करण्याच्या नावावर वसुली करीत आहेत. त्यामुळे दुचाकी वाहनधारकांमध्ये वाहतुक विभागाविरुद्ध चिड निर्माण झाली आहे. (शहर प्रतिनिधी)