कोरोना संकट काळात आयएमएने केला मदतीचा हात पुढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 05:00 AM2021-04-20T05:00:00+5:302021-04-20T05:00:14+5:30
गोंदिया जिल्ह्याला मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यांची सीमा लागून आहे, तर गोंदिया येथे दर्जेदार आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध असल्याने लगतच्या मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण सध्या गोंदिया येथील विविध रुग्णालयात दाखल आहेत. एकूण रुग्णालयाच्या बेडपैकी सद्यस्थितीत ३० टक्के बेड हे बालाघाट जिल्ह्यातील रुग्णांनी भरले आहेत. जिल्ह्यातही कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात तसेच लगतच्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यातसुध्दा कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. मध्यप्रदेशातील ३० टक्के रुग्ण गोंदिया जिल्ह्यात दाखल केले जात आहेत. त्यामुळे रुग्णालयातील खाटा फुल होत आहेत, तर ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. अशात शेजारधर्म पाळत जिल्ह्यासह बाहेरील राज्यातील रुग्णांवर उपचार करण्यासाठी आयएमएने पुढाकार घेतला आहे. यासाठी संबंधित राज्यांनी नियमित ऑक्सिजन पुरवठा करण्याची विनंती केली आहे.
गोंदिया जिल्ह्याला मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यांची सीमा लागून आहे, तर गोंदिया येथे दर्जेदार आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध असल्याने लगतच्या मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण सध्या गोंदिया येथील विविध रुग्णालयात दाखल आहेत. एकूण रुग्णालयाच्या बेडपैकी सद्यस्थितीत ३० टक्के बेड हे बालाघाट जिल्ह्यातील रुग्णांनी भरले आहेत. जिल्ह्यातही कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे.
खा. प्रफुल्ल पटेल व प्रशासनाकडून आता रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा झाल्याने इंजेक्शनची फारशी समस्या नाही. मात्र, ऑक्सिजनची समस्या कायम आहे. जिल्ह्यात मागील चार ते पाच दिवसांपूर्वी ऑक्सिजन तुटवडा निर्माण झाला होता. आ. विनोद अग्रवाल यांनी माजी मंत्री गौरीशंकर बिसेन यांच्याशी चर्चा केल्यानंतर ५० ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करुन देण्यात आले होते. दरम्यान, मध्यप्रदेशातील कोरोना बाधित रुग्ण गोंदिया जिल्ह्यात दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे.
अशात या रुग्णांवर उपचार करण्याची तयारी इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) ने केली आहे. मात्र, यासाठी मध्यप्रदेश सरकारने नियमित ५० ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा जिल्ह्याला करण्याची विनंती केली आहे. यामुळे रुग्णांवर उपचार करण्यास मदत हाेणार आहे. दरम्यान, संकटाच्या काळात आयएमएने घेतलेली भूमिका कौतुकास्पद आहे.
दररोज ६५० जम्बो ऑक्सिजन सिलिंडरची गरज
जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दररोज वाढत आहे. यात गंभीर रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. यामुळे जिल्ह्यात दररोज ६५० ऑक्सिजन सिलिंडर लागत असून, ५०० सिलिंडरचा पुरवठा केला जात आहे. यामुळे १५० सिलिंडरचा तुटवडा कायम आहे. अशात लगतच्या बालाघाट जिल्ह्याने नियमित ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा केल्यास रुग्णांवर उपचार करण्यास मोठी मदत होणार असल्याचे आयएमएचे अध्यक्ष डॉ. विकास जैन यांनी सांगितले.
बालाघाटच्या जिल्हाधिकाऱ्यांची हिरवी झेंडी
बालाघाट जिल्ह्यातील ३० टक्के रुग्णांवर सध्या गोंदिया जिल्ह्यात विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. मात्र, यात ऑक्सिजनची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे बालाघाट जिल्ह्याने दररोज ५० ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा गोंदिया जिल्ह्याला करावा, यासंदर्भात बालाघाटचे जिल्हाधिकारी दीपक आर्य यांच्याशी चर्चा केली. त्यांनीसुध्दा याला हिरवी झेंडी दाखविली. तसेच आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन आयएमएचे अध्यक्ष डॉ. विकास जैन यांना दिले.