‘त्या’ चिमुकलींच्या आरोग्याची काळजी घेणार ‘आयएमए’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:19 AM2021-06-30T04:19:08+5:302021-06-30T04:19:08+5:30
गोंदिया : आई-वडिलांवर काळाने घाला घातलेल्या गोरेगाव तालुक्यातील दोन चिमुकलींच्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता जिल्हाधिकारी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत इंडियन ...
गोंदिया : आई-वडिलांवर काळाने घाला घातलेल्या गोरेगाव तालुक्यातील दोन चिमुकलींच्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता जिल्हाधिकारी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत इंडियन मेडिकल असोसिएशनने मदतीचा हात पुढे केला आहे. आता या दोन्ही चिमुकलींच्या आरोग्याची काळजी वयाच्या १८ वर्षांपर्यंत आयएमए घेणार आहे.
गोरेगाव तालुक्यातील त्या दोन मुलींना आई-बाबांपासून पोरके व्हावे लागले आहे. या मुलींना आपले आई-वडील आता हयात नाहीत, याची देखील जाणीव नाही. या लहान मुलींच्या खेळण्या-बागडण्याच्या या वयामध्ये त्यांच्यावर नियतीने घाला घातलेला आहे. या दोन्ही मुलींचा सांभाळ करण्याची जबाबदारी त्यांच्या ८० वर्षांच्या वयोवृद्ध आजीवर आलेली आहे. या कुटुंबीयांच्या मदतीसाठी जिल्हाधिकारी खवले यांनी आवाहन केले होते. त्यानुसार त्यांच्या मदतीसाठी जिल्ह्यातील अनेक सामाजिक संघटना, संस्था, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन मदतीचा हात पुढे केला आहे. विशेष म्हणजे, इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे संस्थेचे अध्यक्ष डॉ. विकास जैन व कोषाध्यक्ष डॉ. पियुष जयस्वाल यांनी त्या दोन अनाथ मुलींना मोफत मेडिकल सेवा देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्या दोन मुलींच्या आरोग्यासंदर्भात चर्चा केली. तसेच आवश्यकतेनुसार वेळोवेळी मेडिकल सेवा पुरविण्याचे सांगितले. याबद्दल जिल्हाधिकारी खवले यांनी त्यांचे आभार मानले आहेत.