जलयुक्त शिवाराच्या कामाचे त्वरित नियोजन करा
By admin | Published: February 19, 2017 12:20 AM2017-02-19T00:20:50+5:302017-02-19T00:22:22+5:30
स्थानिक उपविभागीय कार्यालय तिरोडा येथे आ. विजय रहांगडाले यांच्या अध्यक्षतेखाली तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्रातील जलयुक्त शिवार
रहांगडाले : नवीन गाव निवडीसंबंधी आढावा
तिरोडा : स्थानिक उपविभागीय कार्यालय तिरोडा येथे आ. विजय रहांगडाले यांच्या अध्यक्षतेखाली तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्रातील जलयुक्त शिवार आढावा सभा घेण्यात आली. या सभेत नवीन गावे निवडीचे नियोजन यासंबंधी आढावा घेण्यात आला.
सभेत सन २०१५- १६ केलेल्या कामाच्या घेतलेल्या एकूण आढाव्यामध्ये गोरेगाव तालुक्याकरिता एकूण ९.८५ कोटी रुपयाचे कामाचे नियोजन झाले. ३८८ कामांपैकी ३०४ कामे आतापर्यंत पूर्ण झाले. मार्च अखेर कामे पूर्ण करण्याचे संबंधित यंत्रणेला आदेश दिले.
तिरोडा तालुक्याकरिता एकूण ६.८३ कोटी रुपयाचे कामाचे नियोजन झाले. एकूण २५१ कामांपैकी ६० टक्के कामे पूर्ण झाले आहेत. उर्वरीत कामे ई-टेंडरिंगच्या प्रक्रियेत असून सदर कामे मार्च अखेर पूर्ण करण्याकरिता संबंधित यंत्रणेला आदेश दिले.
जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात जिल्ह्यातून एक मॉडल तयार करुन व त्याचे अनुकरण संपूर्ण महाराष्ट्र राज्यात करावे यासाठी प्रयत्न करण्याचे सूचविले. अश्याच पध्दतीचे एक काम गोरेगाव तालुक्याच्या सोनेगाव येथे घेण्यात आले आहे. जलयुक्त शिवार अभियानामुळे झालेल्या लाभाची माहिती घेण्यात आली.
सभेत उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी, तहसीलदार रविंद्र चव्हाण, कल्याणकुमार डहाट, गटविकास अधिकारी हिरालाल मानकर, हरिणखेडे, तालुका कृषी अधिकारी पोटदुखे, मंगेश वावधने, न.प. मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे, संबंधित विभागाचे तांत्रिक अधिकारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)