अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 02:47 PM2024-09-16T14:47:01+5:302024-09-16T14:47:49+5:30

धर्मरावबाबा आत्राम : पूरपरिस्थितीचा घेतला आढावा

Immediately report the damage caused by heavy rain | अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा

Immediately report the damage caused by heavy rain

लोकमत न्यूज नेटवर्क 
गोंदिया :
जिल्ह्यामध्ये मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हजारो हेक्टरमधील पिके पाण्याखाली गेल्याने व हातातोंडाशी आलेले पीक जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी संबंधित यंत्रणांना रविवारी (दि.१५) आयोजित बैठकीत केल्या


जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात रविवारी पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. बैठकीला खा. डॉ. प्रशांत पडोळे, जिल्हाधिकारी प्रजित नायर, मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, पोलिस अधीक्षक गोरख भामरे, निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे, माजी आ. राजेंद्र जैन, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांचेसह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 


पालकमंत्री आत्राम म्हणाले, गोंदिया जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरग्रस्तांना शासनाच्या नियमानुसार आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने मदत देण्यात येणार असून मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही असे त्यांनी सांगितले. खा. डॉ. प्रशांत पडोळे म्हणाले अतिवृष्टीमुळे झालेल्या पूरग्रस्त भागाचे सव्र्व्हे करून नुकसानग्रस्तांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. 


पाच जणांचा बळई व २०८९ घरांची पडझड 
जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सर्व आठही तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. या दरम्यान पाच जणांचा मृत्यू झाला. २०८९ घरांचे अंशतः तर ४३ घरांचे पूर्णतः नुकसान झाले आहे. ५१८ गोठ्यांचे नुकसान झाले. लहान-मोठी एकूण ५३ पशुहानी झाली आहे. अतिवृष्टीमुळे चार हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. प्रशासनातर्फे युद्ध पातळीवर जिल्ह्यातील आठही तालुक्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू असून पंचनामे झाल्यानंतर झालेल्या नुकसानीकरिता शासनास प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर लाभ मिळवून देण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी सांगितले.

Web Title: Immediately report the damage caused by heavy rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.