स्थलांतरित मुलांना आणले शिक्षणाच्या प्रवाहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 09:13 PM2019-01-07T21:13:06+5:302019-01-07T21:13:22+5:30
भटकंती व्यवसाय करुन उदरनिर्वाह करणाऱ्या पालकांची भेट घेवून त्यांच्या पाल्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा उपक्रम शिक्षण विभागातर्फे राबविला जात आहे. या अंतर्गत अर्जुनी मोरगाव तालुक्यातील तावशी खुर्द परिसरात वास्तव्य करणाºया पाच मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
इसापूर : भटकंती व्यवसाय करुन उदरनिर्वाह करणाऱ्या पालकांची भेट घेवून त्यांच्या पाल्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा उपक्रम शिक्षण विभागातर्फे राबविला जात आहे. या अंतर्गत अर्जुनी मोरगाव तालुक्यातील तावशी खुर्द परिसरात वास्तव्य करणाºया पाच मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात आले.
गटसाधन केंद्र पंचायत समिती अर्जुनी मोरगाव येथील विषय साधन व्यक्ती शनिवारी (दि.५) शाळा भेटीला जात असताना तावशी (खुर्द) येथील रस्त्याच्या कडेला फोटो फ्रेम विकणारे वाशीम जिल्ह्यातील सात आठ कुटुंब पाल ठोकून वास्तव्यास असलेली आढळली. तिथे जावून चौकशी केली असता ७ ते १४ वयोगटातील ५ मुले आढळली.
त्यांची विचारपूस केली असता त्यांची व पालकांची शिक्षणाविषयी आवड दिसून आली. विषय साधन व्यक्ती यु.एम.पडोळे व त्रिवेणी रामटेके यांनी जि.प.शाळा तावशी येथील मुख्याध्यापिका गभणे व जिल्हा परिषद हायस्कुल अर्जुनी मोरगाव येथील मुख्याध्यापिका कावळे यांच्याशी संपर्क साधला.तसेच या मुलांची तात्पुरती शिक्षणाची सोय उपलब्ध करुन देण्यास सांगितले.
त्यांनी याला लगेच सहमती दर्शविली. त्यानंतर याची माहिती गटशिक्षणाधिकारी एन.जे.सिरसाटे यांना देऊन या पाचही मुलांना शाळेत प्रवेश देऊन शिक्षणाची संधी उपलब्ध करुन देण्यात आली. या पाच मुलांपैकी आदित्य रवि धुर्वे व सुमित तोडसे यांना जिल्हा परिषद हायस्कुल अर्जुनी मोरगाव येथे इयत्ता ७ वी तर आकाशी रवि धुर्वे इयत्ता पहिली, शिवानी विजय धुर्वे इयत्ता ४ थी व शिवम विजय धुर्वे याला इयत्ता दुसरीमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तावशी येथे प्रवेश देण्यात आला.
या वेळी या पाचही विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. शिक्षणाचा अधिकार अधिनियम ७ ते १४ वयोगटातील एकही मुल शाळाबाह्य व शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न केले जाते.
या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गट साधन केंद्रातील विषय साधन व्यक्ती यु.एम.पडोळे, त्रिवेणी रामटेके, सत्यवान शहारे, आर.डी. पातोडे, व्ही.जी. मेश्राम, सी.जे. ढोके, मुख्याध्यापिका गभणे, नवखरे, जिल्हा परिषद हायस्कुलच्या मुख्याध्यापिका कावळे, शिक्षक धनपाल शहारे, खोटेले यांनी सहकार्य केले.