गंगाबाईतील रक्तपेढी बंद करण्याची नामुष्की
By admin | Published: April 16, 2016 01:13 AM2016-04-16T01:13:50+5:302016-04-16T01:13:50+5:30
येथील बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात असलेली जिल्ह्यातील एकमेव शासकीय रक्तपेढी तेथील आरोग्य प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे
एफडीएची कारवाई : आरोग्य प्रशासनाचा हलगर्जीपणा
गोंदिया : येथील बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात असलेली जिल्ह्यातील एकमेव शासकीय रक्तपेढी तेथील आरोग्य प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी बंद करण्याचा आदेश दिला. पुढील आदेशापर्यंत या रक्तपेढीतून रक्त देण्यास आणि तिथे रक्त संकलन करण्यास मनाई केल्यानंतर गंबाबाई रुग्णालयाच्या आरोग्य प्रशासनाची चांगली धावपळ उडाली. ही गोष्ट अनेक रुग्णांच्या जीवावर बेतणारी असल्यामुळे अखेर धावपळ करीत पुन्हा एफडीए आयुक्तांच्या परवानगीने ही रक्तपेढी सुरू करण्यात आली.
अनेक वर्षात पहिल्यांदाच अशा पद्धतीने रक्तपेढी बंद करण्याची नामुष्की ओढवल्यामुळे गंगाबाई रुग्णालय प्रशासनाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. या रक्तपेढीसारख्या महत्वाच्या ठिकाणी काही दिवसांपूर्वीच नियुक्ती देण्यात आलेले डॉ.बजारे दि.४ पासून सुटीवर असताना त्यांच्या अनुपस्थितीतच रक्त संकलन आणि रक्त पुरवठा सुरू होता. अशातच दि.६ एप्रिलला अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी येथे तपासणी केली असता तेथील कारभार चव्हाट्यावर आला. एफडीए अधिकाऱ्यांच्या अहवालावरून या विभागाच्या आयुक्तांनी रक्तपेढी बंद ठेवण्याचे आदेश दिले. मात्र रुग्णांचे हाल पाहिल्यानंतर पुन्हा डॉ.सुवर्णा हुबेकर यांना रक्तपेढीची जबाबदारी सांभाळण्याची सूचना जिल्हा शल्य चिकित्सकांनी केली. त्यानंतर आयुक्तांनी परवानगी दिली. (जिल्हा प्रतिनिधी)