वेतन वेळेवर मिळण्यासाठी सीएमपी प्रणाली लागू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 05:00 AM2020-08-20T05:00:00+5:302020-08-20T05:00:02+5:30
जिल्ह्यातील चार हजार प्राथमिक शिक्षक व केंद्र प्रमुखांना १ तारखेलाच वेतन मिळावे अशी कायमस्वरुपी कार्यवाही करण्यात यावी. नाही तर जिल्हा कोषागार कार्यालयातून वेतन बिल मंजूर झाल्यानंतर शिक्षण विभाग किंवा वित्त विभागातूनच जिल्ह्यातील शिक्षक व केंद्रप्रमुख यांच्या बँक खात्यावर वेतन राशी स्थानांतर करण्यासाठी सीएमपी प्रणाली लागू करण्यात यावी अशी मागणी संघटनेच्यावतीने करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुखांना वेळेवर वेतन मिळावे यासाठी निश्चित धोरण ठरवावे नाही तर सीएमपी प्रणाली लागू करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने केली आहे. आपल्या मागणीसाठी शिक्षक संघाच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश खवले यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.
वेतन १ तारखेला देण्यात यावे असे शासनाचे निर्देश आहेत. निदान ५ तारखेपर्यंत तरी वेतन मिळणे अपेक्षित आहे. मात्र मागील वर्षभरातील सरासरी पाहिली तर प्रत्येक महिन्यात १५-२० दिवस उशिराच वेतन मिळाले आहे. वेतन उशिरा मिळत असल्याने विविध पत संस्था व बँकांकडून गरजांच्या पूर्ततेसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते उशिरा पोहोचल्याने जास्तच्या व्याज आकारणीचा फटका शिक्षकांना सहन करावा लागत असल्याचे शिष्टमंडळाने मुकाअ खवले यांच्या निदर्शनास आणून दिले.
शाळांकडून वेतन बील निश्चित कालावधीत तयार करुन दिल्यानंतरही तालुका व जिल्हास्तरावर विलंब होतो. प्रत्येक महिन्यात वेतन बील सादर केले जातात तरी काहीतरी उणिवा असल्याने कधी वित्त विभाग तर कधी जिल्हा कोषागार कार्यालयातून ते परत केले जातात. उणिवांच्या पूर्ततेसाठी गंभीरता दाखवित नसल्यानेही वेतन उशिरा मिळते.
त्यात बिल जिल्हा कोषागार मधून मंजूर झाल्यानंतर वित्त विभागामार्फत गटशिक्षणाधिकाऱ्यांना धनादेश दिले जातात. त्यांच्या खात्यात धनादेश जमा झाल्यानंतर त्या-त्या शाळांची वेतन राशी मुख्याध्यापकांच्या खात्यावर टाकली जाते. मग शिक्षकांचे वेतनाच्या राशीचे चेक मुख्याध्यापकांनी बँकेत जमा केल्यानंतर शिक्षकांच्या खात्यावर वेतन स्थानांतरीत केले जाते.
या कालावधीत सण, सुट्या किंवा बँकेतले कर्मचारी इतर कामात असले तर वेतनात विलंब होतो असे मुख्य कार्यकारी अधिकारी खवले यांच्या लक्षात आणून देण्यात आले.
जिल्ह्यातील चार हजार प्राथमिक शिक्षक व केंद्र प्रमुखांना १ तारखेलाच वेतन मिळावे अशी कायमस्वरुपी कार्यवाही करण्यात यावी. नाही तर जिल्हा कोषागार कार्यालयातून वेतन बिल मंजूर झाल्यानंतर शिक्षण विभाग किंवा वित्त विभागातूनच जिल्ह्यातील शिक्षक व केंद्रप्रमुख यांच्या बँक खात्यावर वेतन राशी स्थानांतर करण्यासाठी सीएमपी प्रणाली लागू करण्यात यावी अशी मागणी संघटनेच्यावतीने करण्यात आली.
चर्चेला संघटनेचे जिल्हा नेते आनंद पुंजे, जिल्हाध्यक्ष डी.टी.कावळे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख कृष्णा कापसे व तालुकाध्यक्ष अशोक तावाडे उपस्थित होते.
उशिर करणाऱ्यांवर कारवाई
चर्चेत, मुख्य कार्यकारी अधिकारी खवले यांनी वेतन वेळेवर मिळालेच पाहिजे असे स्पष्ट मत व्यक्त केले. तसेच याबाबतीत निश्चितच अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले. तसेच वेतन उशिरा मिळण्यासाठी जबाबदार घटकांवर कार्यवाही करण्याचे सक्त निर्देश दिले.