प्रभावी अंमलबजावणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 10:13 PM2017-09-13T22:13:06+5:302017-09-13T22:13:43+5:30
आरोग्य आणि स्वच्छता राखण्याच्या बाबतीत सफाई कामगारांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. मात्र त्यांच्याच समस्यांकडे दुर्लक्ष होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आरोग्य आणि स्वच्छता राखण्याच्या बाबतीत सफाई कामगारांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. मात्र त्यांच्याच समस्यांकडे दुर्लक्ष होते. सफाई कामगारांसाठी असलेल्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी संबंधित यंत्रणांनी करावी, असे निर्देश राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष रामू पवार यांनी दिले.
मंगळवार (दि.१२) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्ह्यातील सफाई कर्मचाºयांच्या समस्यांबाबत आढावा सभा घेण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते.
सभेला जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, गोंदिया न.प. मुख्याधिकारी चंदन पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्याम निमगडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, तिरोडा न.प. मुख्याधिकारी विजय देशमुख, जि.प. प्रभारी समाजकल्याण अधिकारी मिलिंद रामटेके, समाजकल्याण अधिकारी संभाजी पवार, सफाई कर्मचाºयांचे नेते नंदिकशोर महतो, जियसंग कछवा, सतीश सिरसवान, मोती जनवारे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
पवार म्हणाले, लोकसंख्येच्या आधारावर नगरपालिका क्षेत्रात सफाई कामगारांची भरती करण्यात यावी. शहरात स्वच्छता राखण्यासाठी नगरपालिकेने तातडीने सफाई कामगारांची भरती करावी. आज मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाले आहे. त्या तुलनेत सफाई कामगारांची संख्या वाढलेली नाही. त्यामुळे स्वच्छता राखण्यात अडचणी निर्माण होत आहेत. नगरपालिकेने स्वच्छता राखण्यासाठी आराखडा तयार करावा. गोंदिया शहरासाठी आज ६६० सफाई कामगारांची आवश्यकता असताना केवळ २०७ सफाई कर्मचारी स्थायी, अस्थायी पध्दतीने काम करीत आहेत. सफाई कर्मचाºयांची कमतरता असल्यामुळे रोगराई वाढत आहे, असे ते म्हणाले.
यावर जिल्हाधिकारी काळे म्हणाले, जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रातील व आरोग्य विभागातील सफाई कामगारांची रिक्त पदे भरण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल. सफाई कामगारांचे प्रश्न सहानुभूतीपूर्वक सोडविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
देशमुख म्हणाले, तिरोडा नगरपरिषदेमध्ये २००५ च्या मंजूर आकृतीबंधानुसार सफाई कामगारांची २३ स्थायी पदे व सहा अस्थायी पदे मंजूर आहेत. सद्यस्थितीत एकही सफाई कामगाराचे पद रिक्त नाही. सफाई कर्मचाºयांना त्यांच्या शैक्षणकि गुणवत्तेनुसार पदोन्नती देण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा पदोन्नती समितीकडे सादर केला आहे. काही कामगारांना घरे मंजूर करण्यात आली आहे. काहींचे घर बांधून देण्याचे प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
या वेळी सफाई कर्मचाºयांचे प्रतिनिधी शशी सारवान, विजय मोगरे, मनोज डकाहा, सोनू मारवे, भूषण ढंडोरे यांच्यासह विविध सफाई कामगारांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे यांनी मानले.
सफाई कामगारांच्या मागण्या
यावेळी उपस्थित सफाई कामगार प्रतिनिधींनी ५ तारखेच्या आत सफाई कामगारांचा पगार झाला पाहिजे. पाचव्या व सहाव्या वेतन आयोगाचा लाभ त्यांना मिळाला पाहिजे. सेवानिवृत्तीनंतर सहा महिन्यांच्या आत सेवानिवृत्तीचा लाभ मिळाला पाहिजे. सफाई कामगार ज्या ठिकाणी अनेक वर्षांपासून राहत आहेत त्यांच्या नावावर मालकी पट्टे देण्यात यावे. सफाई कर्मचाºयांसाठी समाज भवन असावे. सफाई कामगारांचे योग्य ते पुनर्वसन व्हावे. रोजंदारी सफाई कर्मचाºयांना कायम सेवेत सामावून घ्यावे. नगरपालिका व आरोग्य विभागात रिक्त असलेली सफाई कामगारांची रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या.
सफाई कर्मचाºयांना कालबद्ध पदोन्नती
यावेळी पाटील म्हणाले, गोंदिया नगर परिषदेतील सफाई कामगारांची रिक्त पदे तातडीने भरण्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव दोन महिन्यांच्या आत राज्य शासनाकडे पाठविण्यात येईल. सफाई कामगारांना घाण भत्ता आणि गणवेश धुलाई भत्ता देण्यात येतो. सफाई कामगारांना ३४ घरे बांधून देण्यात आली आहे. चार सफाई कामगारांना मुकादम या पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. ४२ पात्र सफाई कर्मचाºयांना कालबध्द पदोन्नतीचा लाभ देण्याची कार्यवाही सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
सफाई कर्मचाºयांची पदे तातडीने भरा
वाढत्या लोकसंख्येचा भार सफाई कामगारांवर येतो असे सांगून पवार म्हणाले, सफाई कामगार भरतीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारे शासकीय यंत्रणेने सफाई कामगारांची रिक्त पदे तातडीने भरण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा. प्रधानमंत्र्यांचे स्वच्छ भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सफाई कामगारांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. सफाईबाबत नागरिकांच्या तक्र ारी येणार नाही, यासाठी संबंधित यंत्रणेने दक्षता घ्यावी. सफाई कामगारांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी लाड समितीच्या शिफारसीची अंमलबजावणी करावी. सफाई कामगारांच्या पाल्यांना वारसा हक्कानुसार सेवेत सामावून घ्यावे, असेही त्यांनी सांगितले.