अश्लील फोटो, व्हिडीओ पाठवाल तर तुरुंगवारी अटळ !
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 05:46 PM2024-05-11T17:46:24+5:302024-05-11T17:46:52+5:30
सोशल मीडियावर खबरदारी घेण्याचा सल्ला: तक्रार आल्यास होणार कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राज्यात अनेक ठिकाणी सोशल मीडियावर अश्लील फोटो, व्हिडीओ शेअर केले जात असल्याची प्रकरणे उघडकीस येत आहेत. अश्लील फोटो, व्हिडीओ, चाइल्ड पोर्नोग्राफी शेअर केल्याची तक्रार आल्यास संबंधिताला थेट जेलची हवा खावी लागणार आहे.
मोबाइल, सोशल मीडियाचे जसे फायदे आहेत, त्याचप्रमाणे काही तोटेही आहेत. व्हॉट्सअॅप यासह सोशल मीडियाचा वापर वाढलेला आहे. सोशल मीडियावर अश्लील फोटो, व्हिडीओ व्हायरल करण्याचे प्रकारही राज्यात वाढीस लागले आहेत. नुकतेच गोरेगाव तालुक्यात असाच एक प्रकार उघडकीस आला होता. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातही असले प्रकार घडू नयेत म्हणून सायबर पोलिस स्टेशन सतर्क झाले असून, सोशल मीडियावर अश्लील संदेश, व्हिडीओ, फोटो शेअर करू नये, अशा सूचना देण्यात आल्या.
सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये, तसेच अनोळखी ग्रुपमध्ये समाविष्ट होऊ नये. मोबाइलमधून अश्लील संदेश, फोटो, व्हिडीओ शेअर करणाऱ्याला थेट जेलची हवा खावी लागणार आहे. त्यामुळे वेळीच सावध होऊन अश्लील संदेश, फोटो शेअर होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असा सल्ला सायबर पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी दिला.
मुलांवर लक्ष ठेवा
सध्या उन्हाळी सुट्या असल्याने मुले मोबाइलच्या आहारी जात असल्याचे दिसून येते. वयाच्या १०, ११ व्या वर्षानंतर मुले मोबाइल, इंटरनेटवर काय पाहत राहतात, यावर पालकांनी लक्ष ठेवणे गरजेचे झाले आहे. आपला मुलगा एखादा अश्लील व्हिडीओ किंवा फोटो तर पाहत नाही ना, शेअर करीत नाही ना. याकडे पालकांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. फोटो, व्हिडीओ, चुकीचे संदेश इतरांना शेअर करू नये. असे केल्याचे आढळून आल्यास कारवाई केली जाईल असा इशारा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी दिला आहे.
चाईल्ड पोर्नोग्राफीबाबत सात वर्षापर्यंत शिक्षा
चाइल्ड पोर्नोग्राफीचा व्यावसायिक वापर, संबंधित व्हिडीओ पाहणे, संग्रहित ठेवल्यास अथवा वितरण केल्यास कठोर शिक्षा होऊ शकते. पोक्सो कायद्यातील सुधारित प्रस्तावानुसार या गुन्ह्यात दंड व पाच वर्षे तुरुंगवास होऊ शकतो. दुसऱ्यांदा दोषी आढळल्यास सात वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद आहे, असे सायबर पोलिस स्टेशनच्या सहायक पोलिस निरीक्षकांनी सांगितले.