बिघडलेली आरोग्य सेवा सुधारा
By Admin | Published: May 25, 2017 12:47 AM2017-05-25T00:47:55+5:302017-05-25T00:47:55+5:30
जिल्ह्याचे शेवटच्या टोकापासून येणाऱ्या महिला प्रसूती व इतर आजाराकरीता दाखल होतात. महिलांसाठी असलेल्या या एकमेव रुग्णालयाची परिस्थिती सद्या विदारक आहे.
बीजीडब्ल्यूतील बालमृत्यूची चौकशी करा : प्रफुल्ल पटेलांच्या नेतृत्वात १ जूनला आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्याचे शेवटच्या टोकापासून येणाऱ्या महिला प्रसूती व इतर आजाराकरीता दाखल होतात. महिलांसाठी असलेल्या या एकमेव रुग्णालयाची परिस्थिती सद्या विदारक आहे. बालमृत्यू दर हा कमी व्हावा हा शासनाचा दृष्टीकोण असला तरी या रुग्णालयात १ एप्रिल ते १३ मे २०१७ पर्यंत ३४ बालकांचा मृत्यू झाल्याचे प्रकरण बाहेर आल्याने शासन व जिल्हा प्रशासन या विषयावर किती गंभीर आहे हे स्पष्ट होते. याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी खा. प्रफुल पटेल यांनी केली आहे.
जिल्हास्तरावर महिलांसाठी शासनाच्या वतीने चालविण्यात येणारे बाई गंगाबाई हे एकमेव महिला रुग्णालय आहे. या रुग्णालयासारखी जिल्ह्यातील इतर आरोग्य केंद्रात परिस्थिती आहे यात शंका नाही. गंगाबाईतील बालमृत्यू प्रकरणाची शासनाने वरिष्ठ पातळीवरून तातडीने चौकशी करावी व दोषीवर कारवाई करावी, मृत्यूमुखी पडलेल्या बालकांच्या कुटुंबाला तातडीने शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी खा. प्रफुल पटेल यांनी शासनाकडे केली आहे. गंगाबाईचे बालमृत्यू प्रकरण शासनाला काळीमा फासणारे आहे. या गंभीर प्रकरणाच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष १ जूनला गोंदिया येथे धरणे आंदोलन करून या प्रकरणाला वाचा फोडण्याचे काम करणार, अशी माहिती खा. पटेल यांनी दिली.
जिल्हास्तरावरील महिलांसाठी असलेले बाई गंगाबाई रुग्णालय गोरगरीब व सामान्य माणसाचे आशा स्थान आहे. जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रामधून व नागरिकांकडून महिलांना प्रसूतीसाठी व इतर आजारासाठी या रुग्णालयात दाखल केले जाते. सद्याच्या काळात या महिला रुग्णालयाची परिस्थिती विदारक असल्याचे जाणवत आहे. सद्या हे रुग्णालय जिल्ह्यात चर्चेचा विषय झाला आहे. या रुग्णालयात तातडीने सुधारणा करणे गरजेचे आहे. एकीकडे राज्य सरकार व केंद्र सरकार प्रसिध्दी माध्यमाच्या वतीने सर्वांना आरोग्याकडे विशेष लक्ष असल्याचे सांगते मात्र या रुग्णालयात दिड महिन्यात ३४ बालकांचा मृत्यू होणे ही जिल्हा प्रशासनाला, केंद्र आणि राज्याला काळीमा फासणारी गोष्ट आहे. कुपोषण मुक्त भारत करण्याची घोषणा करणाऱ्या शासनाला याचा विसर पडला असेच म्हणावे लागेल. आरोग्य सुविधा ही आवश्यक सेवा असून ही गोंदिया जिल्ह्यात ही परिस्थिती निर्माण व्हावी ही सुध्दा शरमेची बाब आहे. ज्यांचे मूल दगावलीत त्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलेला आहे. जिल्हा स्तरावरील रुग्णालयात ही परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद व उपकेंद्रात काय अवस्था असेल याची कल्पनाच न केलेली बरी. जिल्ह्यातील संपूर्ण आरोग्य सेवा कोलमडून पडलेली आहे असेच म्हणावे लागेल. सदर प्रकार अत्यंत धक्कादायक व मनसुन्न करणारा आहे. या प्रकरणाची शासनाने वरिष्ठ पातळीवरुन तातडीने चौकशी करावी, दोषींवर तातडीने कारवाई करावी, कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरावी, मूल दगावली त्या परिवाराला शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी, शासनाने संबधितांना न्याय दिला नाही तर १ जून रोजी गोंदिया येथे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करून न्याय देण्यास शासनाला भाग पाडू, असे ही प्रफुल पटेल म्हणाले.