आरोग्य सेवेत तातडीने सुधारणा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 05:00 AM2020-08-17T05:00:00+5:302020-08-17T05:00:18+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता व जिल्हा शल्य चिकित्सकांनी चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी योग्य समन्वय ठेवावा. सर्व व्हेंटीलेटर्स चालू स्थितीत असावेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जास्तीतजास्त अॅँटीजन चाचण्या कराव्यात. मृत्यू दर वाढणार नाही यादृष्टीने विशेष काळजी घ्यावी. ज्येष्ठ नागरिक, बालके व गर्भवती महिलांकडे विशेष लक्ष द्यावे. एका बाधिताच्या कमीतकमी २० चाचण्या झाल्या पाहिजे असे सांगीतले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने रूग्णांची संख्या देखील वाढत आहे. आरोग्य यंत्रणा चांगल्याप्रकारे काम करीत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे आरोग्य सेवेत तातडीने सुधारणा करा, असे निर्देश पालकमंत्री अनिल देशमुख यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात शनिवारी (दि.१५) कोरोना संसर्ग परिस्थितीचा आढावा घेताना ते बोलत होते. याप्रसंगी आमदार विनोद अग्रवाल, मनोहर चंद्रिकापुरे, सहषराम कोरोटे, जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश खवले, सहायक जिल्हाधिकारी सावन कुमार प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना नामदार देशमुख यांनी, जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रूग्णांची आरोग्य यंत्रणेने चांगली काळजी घ्यावी व चांगला आहार द्यावा. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता व जिल्हा शल्य चिकित्सकांनी चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी योग्य समन्वय ठेवावा. सर्व व्हेंटीलेटर्स चालू स्थितीत असावेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जास्तीतजास्त अॅँटीजन चाचण्या कराव्यात. मृत्यू दर वाढणार नाही यादृष्टीने विशेष काळजी घ्यावी. ज्येष्ठ नागरिक, बालके व गर्भवती महिलांकडे विशेष लक्ष द्यावे. एका बाधिताच्या कमीतकमी २० चाचण्या झाल्या पाहिजे असे सांगीतले.
तसेच जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य यंत्रणेला नऊ कोटी १७ लक्ष रूपये दिल्याचे सांगत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा सामान्य रूग्णालय, शासकीय स्त्री रूग्णालय व कोविड केअर सेंटर येथे कायम स्वच्छता राहील याकडे विशेष लक्ष द्यावे. आरोग्य विभाग व महसूल विभागाकडे अधिकाऱ्यांसाठी काही वाहने नसल्यामुळे तसा प्रस्ताव द्यावा. खनिकर्म प्रतिष्ठान निधीतून नवीन वाहने खरेदीची कार्यवाही त्वरीत करता येईल. भाजी बाजार व बाजारपेठेत कोरोनासंबंधी असलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे सांगीतले. याप्रसंगी आमदार अग्रवाल यांनी, आरोग्य विभाग कोरोना रूग्णांना चांगल्या सुविधा देत नाही. स्वच्छता व भोजनाबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. आरोग्य विभागाप्रती नागरिकांमध्ये गैरसोयीबाबत रोष आहे. ज्या डॉक्टरांची ड्यूटी आहे ते डॉक्टर कधीच ड्यूटीवर दवाखान्यात आढळून येत नाही. जिल्ह्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रूग्णवाहिका नादुरुस्त आहेत. गोंदिया उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना वाहन नसल्याची बाब त्यांनी पालकमंत्र्यांच्या लक्षात आणून दिली.
आमदार कोरोटे यांनी, नक्षलग्रस्त व आदिवासी बहुल दुर्गम भागातील सालेकसा तालुक्यातील दरेकसा आणि देवरी तालुक्यातील ककोडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना रूग्णवाहिका नसल्यामुळे रूग्णांना तेथून पुढे उपचारासाठी नेताना अडचण निर्माण होते. देवरी ग्रामीण रूग्णालयाची दुरवस्था झाली असून तेथील स्वच्छतेकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे यांनी, प्रयोगशाळा विषाणू चाचणी आणि रॅपिड अॅँटीजन टेस्टच्या माध्यमातून कोरोना बाधित रूग्णांचा शोध घेण्यात येत आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने १८६१ बेड उपलब्ध करून देण्यात आले असून १३ क्वारंटाईन सेंटर आहे. आॅक्सीजन सपोर्टेड ४१२ बेड उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. यासह कोरोनाच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती देखील दिली.
पोलीस अधीक्षक शिंदे यांनी, जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी २४ तास नाकाबंदी करण्यात येत आहे. २ अधिकारी आणि १४ कर्मचारी कोरोना बाधित झाले आहे. प्रत्येक कंटेन्मेंट झोनला पोलीस बंदोबस्त देण्यात आला असल्याचे सांगितले. गोंदिया नगरपालिकेचे मुख्याधिकारी चव्हाण यांनी, शहरात अग्नीशमन वाहनाच्या माध्यमातून नियमीत सॅनिटायझींग करण्यात येत असून स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्यात येत असल्याचे सांगीतले. सभेला निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.भूषणकुमार रामटेके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिथीलेश चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी कावेरी नाखले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ.विनायक रूखमोडे, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन कापसे, उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, गोंदिया उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, अर्जुनी-मोरगावच्या उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, तसेच सर्व तालुका आरोग्य अधिकारी व नगरपालिका- नगरपंचायतचे मुख्याधिकारी उपस्थित होते.