पवित्र पोर्टलच्या ‘अपवित्र’ हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 09:32 PM2019-05-08T21:32:10+5:302019-05-08T21:33:05+5:30

राज्यातील लाखो बेरोजगार डीएड-बीएड पात्रताधारकांसाठी आशेचे किरण बनलेले शिक्षक भरतीचे पवित्र पोर्टल अलीकडे पोर्टलवरील अपवित्र हालचालींनी डोकेदुखी ठरत आहे. यामुळे अर्हताधारकांच्या नोकरीच्या आशा धुसर झाल्या असून निरुत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

The 'impure' movements of the Holy portal | पवित्र पोर्टलच्या ‘अपवित्र’ हालचाली

पवित्र पोर्टलच्या ‘अपवित्र’ हालचाली

Next
ठळक मुद्देनोकरीची आशा धुसर : पात्रताधारकात निरुत्साह

लोकमत न्यूज नेटवर्क
वडेगाव : राज्यातील लाखो बेरोजगार डीएड-बीएड पात्रताधारकांसाठी आशेचे किरण बनलेले शिक्षक भरतीचे पवित्र पोर्टल अलीकडे पोर्टलवरील अपवित्र हालचालींनी डोकेदुखी ठरत आहे. यामुळे अर्हताधारकांच्या नोकरीच्या आशा धुसर झाल्या असून निरुत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्यात शासनातर्फे २००८ या वर्षात शिक्षक भरती झाल्यानंतर मागील ११ वर्षांपासून शिक्षक भरतीसाठी शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ लागू झाला. त्यामुळे राज्यात अतिरीक्त शिक्षकांची समस्या भेडसावत आहे. शिक्षक संच मान्यतेचे अनेक प्रकरण प्रलंबित असताना राज्य शासनाने डीएड-बीएड बेरोजगारांना शिक्षक भरतीचा लॉलीपॉप दाखविणे सुरु केले आहे. शिक्षक पात्रता परीक्षेच्या नावाखाली पात्रताधारकांकडून दरवर्षी बक्कळ रक्कम गोळा केल्यानंतर शिक्षक बुद्धीमत्ता व अभियोग्यता चाचणी नावाचा नवीन पिल्लू काढण्यात आला. परंतु यावेळी पात्रताधारकांकडून तीव्र असंतोष व्यक्त केला गेला. हा असंतोष शमविण्यासाठी शासनातर्फे शिक्षक भरती करणार असल्याचा गाजावाजा करण्यात आला. त्यासाठी ३० मे २०१७ रोजी पवित्र पोर्टल (पोर्टल फॉर व्हिजीबल टू आॅल रिचर्स रिक्रूटमेंट) चे नामकरण करण्यात आले. त्यानंतर राज्यातील जिल्हा परिषद, नगरपरिषद, महानगरपालिका, खासगी संस्थाकडून ई-निविदांच्या धर्तीवर उपलब्ध जागांची मागणी करण्यात आली. १२ मार्च २०१८ रोजी शासनाने शासन निर्णय जारी करुन पवित्र पोर्टलला शिक्षक भरतीसाठी रितसर मान्यता दिली. मात्र आज पवित्र पोर्टलला वर्ष लोटूनही पदभरतीच्या कुठल्याही पवित्र हालचाली सुरु झालेल्या नाहीत. याऊलट पवित्र पोर्टल आल्यापासून पात्रताधारकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पोर्टलवर उमेदवार अर्ज नोंदणी करण्याचा अपवित्र हालचालींनी डोकेदुखी वाढली आहे. पवित्र पोर्टलवर उमेदवार नोंदणी करणे, अर्ज भरणे, प्रत स्वप्रमाणित करणे, ड्राफ्ट कॉपी, वेरीफाईड कॉपी अशा अनेक अपवित्र हालचालींनी उमेदवारांच्या नाकी नऊ आले आहे. पवित्र पोर्टलच्या अपवित्र हालचाली एवढ्यातच थांबलेल्या नाहीत. एप्रिलमध्ये उमेदवारांना उपलब्ध जागा दाखवून पसंतीक्रम भरण्याची सूचना असताना अद्याप हालचाली शून्य आहेत. उलट पवित्र पोर्टल विरोधात अनेक याचिका न्यायालयात प्रलबिंत आहेत. तर न्यायालयाला उन्हाळी सुटी असल्यामुळे जूनपर्यंत न्यायालयाचे दार बंद आहेत. शिवाय पवित्र पोर्टलवरील भरतीच्या अनुषंगाने खासगी संस्थाचालक, इंग्रजी डीएड धारकांना २० टक्के राखीव जागा, संस्थांना उमेदवार निवडीचे अधिकार अशा अनेक अपवित्र याचिकांवर योग्य निर्णय लागेलच की नाही याबाबद शंका उपस्थित केली जात आहे.
शिक्षक संघटनाचा विरोध कायम
राज्यातील शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न त्यांच्या नोकरीवर गदा आणत असताना शासनाद्वारे शिक्षक भरतीचा पोकळ आव आणला जात आहे. याचा राज्यातील शिक्षक संघटनांनी विरोध केला.शासनाद्वारे अनेक सबबी पुढे करुन सरकारी शाळा बंद केल्या जात आहेत. आंतरराष्ट्रीय शाळेच्या नावाखाली स्वतंत्र चूल थाटली जात आहे. अतिरीक्त शिक्षक वाऱ्यावर आहेत, शिक्षण विभागातील पदवीधर, केंद्रप्रमुख, विषय शिक्षकांची पदे कार्यरत शिक्षकांमधून न भरता सरळसेवेतून भरती जात आहेत. यामुळे शिक्षक संघटनांनी या भरतीला विरोध दर्शविला आहे. दरम्यान पवित्र पोर्टलच्या अपवित्र हालचाली थांबून पवित्र शिक्षक भरती सुरु होते की, शिक्षक भरतीचा फार्स होतो याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

Web Title: The 'impure' movements of the Holy portal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Teacherशिक्षक