नवेगावबांध येथे अशुद्ध पाणी पुरवठा
By admin | Published: August 2, 2015 01:59 AM2015-08-02T01:59:53+5:302015-08-02T01:59:53+5:30
येथील ग्राम पंचायतमार्फत नळ योजना चालविण्यात येत आहे. सदर योजनेला जल शुध्दीकरणाची व्यवस्था नसल्याकारणाने तलावातील पाणी सरळसरळ नळाद्वारे पुरविल्या जाते.
प्रश्न आरोग्याचा : डायरियासह विविध आजार जडू शकतात
नवेगावबांध : येथील ग्राम पंचायतमार्फत नळ योजना चालविण्यात येत आहे. सदर योजनेला जल शुध्दीकरणाची व्यवस्था नसल्याकारणाने तलावातील पाणी सरळसरळ नळाद्वारे पुरविल्या जाते. पावसाळ्याच्या दिवसात तलावाचे पाणी गढूळ असते. त्यामुळे गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
नवेगावबांध येथे अनेक वर्षापासून ग्रामपंचायतीद्वारे नळ योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये नवेगावबांध जलाशयाचे पाणी मोटारपंपाद्वारे गावातील पाणी टाकीमध्ये भरले जाते. तेच पाणी नळाद्वारे नागरिकांना पुरविले जाते. वास्तविकपणे पावसाळ्याच्या दिवसात विविध ठिकाणचे पाणी तलावात वाहून येते. त्यामुळे तलावाचे पाणी गढूळ झाले आहे. त्याच पाण्याचा पुरवठा नळ योजनेद्वारे नागरिकांना केला जातो. विशेषत: पावसाळ्यामध्ये अनेक संक्रामक रोग पाण्याद्वारे पसरत असतात. अशातच पाणी जर अशुध्द येत असेल तर त्याची शक्यता अधिक असते.
वास्तविकपणे नवेगावबांध जलाशयावर खांबी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना व सिरेगावबांध प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सध्या सुरू आहेत. या दोन्ही योजनांद्वारे परिसरातील २२ गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. परंतु या योजनांमध्ये नवेगावबांधचा समावेश करण्यात आला नाही. ज्या गावच्या तलावावर दोन-दोन पाणी पुरवठा योजनेचे पंप आहेत. त्याच गावाचा योजनेत समावेश करण्यात आला नाही याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
शुध्द पिण्याचे पाणी मिळणे हा नागरिकांचा अधिकार आहे. त्या अधिकारालाच डावलण्यात येत असल्याचे बोलले जाते. पिण्याच्या पाण्याच्या बदल्यात नागरिक पाणीपट्टी कर देखील देतात परंतु सदर पाण्याच्या शुध्दतेकडे विशेषत: लक्ष दिले जात नाही याचेही आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
चांगल्या बाबीसाठी ग्रामपंचायतने धाडसी निर्णय घेणे आवश्यक आहे. परंतु येथे देखील मतांचे राजकारण होत असल्यामुळे तसे निर्णय घेतले जात नाहीत असा अनेकांचा आरोप आहे. त्यामुळे ग्रामपंचायतने आता तरी शुध्द पाण्याचा पुरवठा करून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी अशी नागरिकांची मागणी आहे. (वार्ताहर)