पाणीटाकीवर चढताच निघाला मागण्यांवर तोडगा; पगारासाठी लावली जिवाची बाजी
By कपिल केकत | Published: December 7, 2023 07:19 PM2023-12-07T19:19:30+5:302023-12-07T19:20:23+5:30
कंत्राटी अग्निशमन कर्मचाऱ्यांची वीरूगिरी :
कपिल केकत, गोंदिया : चार महिन्यांपासून पगार मिळाला नाही, शिवाय पगारही बँक खात्यातून दिला जात नसल्याने या मागण्यांसाठी कंत्राटी अग्निशमन कर्मचारी शुक्रवारपासून (दि.१) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनास बसले आहेत. त्यांच्या या आंदोलनाची अद्याप कुणाच अधिकाऱ्याने दखल घेतली नसल्याने अखेर त्यांनी गुरुवारी (दि.७) पाणीटाकीवर चढून आंदोलन केले. यानंतर मात्र लगेच तोडगा निघाला असून, यंत्रणा कामाला लागली आहे. येत्या दोन दिवसांत मागण्या निकाली काढण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.
येथील अग्मिशमन विभागात कंत्राटीतत्त्वावर कार्यरत कर्मचाऱ्यांना मागील चार महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. शिवाय, त्यांना फक्त आठ- नऊ हजार रुपये पगार दिला जात असून, तोही बँक खात्यात दिला जात नाही. वारंवार मागणी करूनही त्यांच्या या मागण्यांकडे कुणी लक्ष देत नाही. यावर सुमारे ४४ कंत्राटी अग्निशमन कर्मचारी मागील महिनाभरापासून कामबंद करून सुटीवर गेले होते. या कालावधीत त्यांनी मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांना निवेदन दिले. मात्र, त्यांच्या मागण्यांकडे कुणीही लक्ष दिले आहे. अशात या कंत्राटी कर्मचाऱ्यांमधील सुमारे २४ कर्मचाऱ्यांनी शुक्रवारपासून (दि.१) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. मात्र, एवढ्यावरही त्यांच्या आंदोलनाची कुणा अधिकारी व लोकप्रतिनिधीने दखल घेतली नाही.
यामुळे संतप्त झालेल्या १५ कर्मचाऱ्यांनी गुरुवारी (दि.७) जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील पाण्याच्या टाकीवर चढून आपल्या मागण्यांसाठी आंदोलन केले. त्यांच्या या आंदोलनानंतर मात्र पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून त्यांना खाली उतरविण्याचा प्रयत्न केला. शिवाय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) दौंड येथील माजी आमदार प्रवीण राठोड व जिल्हाध्यक्ष सौरभ रोकडे यांनीही त्यांची समजूत काढून, तसेच जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून मागण्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. यावर कुठे पाणीटाकीवर चढलेले कर्मचारी खाली उतरले.
दोन दिवसांत मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन
माजी आमदार राठोड यांनी समजूत घातल्यानंतर सर्वच कर्मचारी टाकीवरून खाली उतरले. यानंतर राठोड यांच्यासह सर्व कर्माचाऱ्यांनी जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांची भेट घेऊन मागण्यांवर चर्चा केली. याप्रसंगी गोतमारे यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यांचा चार महिन्यांचा पगार तोही खात्यातून दोन दिवसांत करवून देण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे आता दोन दिवसांत कर्मचाऱ्यांचा पगार तोही खात्यातून झाल्यास हे कर्मचारी कामावर परतणार, असे दिसत आहे. यामुळे आता जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
हे ‘वीरू’ चढले पाण्याच्या टाकीवर
आंदोलनास बसलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी राहुल ढोमणे, सत्यम बिसेन, सुमित बिसेन, आदित्य भाजीपाले, शुभम ढेकवार, आश्विन मेश्राम, रंजित रहांगडाले, सुनील मानकर, महेंद्र चाचिरे, अरविंद बिलोने, राहुल नागपुरे, मंगेश भुरे, अतुल जैतवार, राहुल गौतम व मनीष रहांगडाले हे पाणीटाकीवर चढले होते. मागणी पूर्ण होत नाही तोवर खाली उतरणार नाही, असा निश्चय करून हे पाणीटाकीवर चढले होते. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून मार्ग काढण्याचे पोलिस अधिकारी व माजी आमदार राठोड यांच्या आश्वासनानंतर या आंदोलनाचे प्रमुख सचिन बहेकार यांनी त्यांची समजूत घातली व अखेर सर्व पाणीटाकीवरून खाली उतरले.