कोणाची दिवाळी, कोणाचं दिवाळं? दिवाळीआधीच आमदारांची परीक्षा!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 03:31 PM2023-10-18T15:31:55+5:302023-10-18T15:32:42+5:30
जिल्ह्यात सार्वत्रिक ४, पोटनिवडणुकांसाठी १० ग्रामपंचायतींमध्ये लगबग
गोंदिया : जिल्ह्यात ४ ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक व १० ग्रामपंचायतींमधील रिक्त सदस्य व सरपंचपदांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे या गावांमध्ये दिवाळीपूर्वीच फटाके फुटणार आहेत. याशिवाय आगामी निवडणुकीच्या दृष्टीने नागरिकांचा कलही समोर येणार आहे.
जानेवारी ते डिसेंबर २०२३ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य निवडणूक आयोगाने ३ नोव्हेंबर रोजी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. त्या अनुषंगाने १६ ऑक्टोबरपासून अर्जप्रक्रिया सुरू होत आहे. २५ ऑक्टोबर रोजी अर्जाची माघार व निवडणूक चिन्हांचे वाटप होणार आहे व त्यानंतरच या गावांमध्ये निवडणुकीची रंगत वाढणार आहे.
१४ ग्रामपंचायतींच्या जिल्ह्यात निवडणुका
- जिल्ह्यात ४ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. तर १० ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक होत आहे. अशा प्रकारे एकूण १४ ग्रामपंचायतींची निवडणूक घेतली जाणार आहे.
विजयादशमीनंतर चित्र होणार स्पष्ट
सार्वत्रिक व पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. त्यापूर्वी २४ ऑक्टोबर रोजी दसरा असल्याने त्यानंतर या निवडणुकांचे चित्र स्पष्ट होणार आहे. निवडणुकांमुळे गावांतील वातावरण तापले आहे.
दिवाळीआधीच आमदारांची परीक्षा
- विनोद अग्रवाल, गोंदिया विधानसभा मतदारसंघ
- गोंदिया विधानसभा क्षेत्रांतर्गत फक्त ग्राम माकडी येथे सार्वत्रिक निवडणूक घेतली जात आहे. यापूर्वी झालेल्या निवडणुकांत आमदार अग्रवाल यांच्या गटानेच बाजी मारली आहे.
- विजय रहांगडाले, तिरोडा विधानसभा मतदारसंघ
- गोरेगाव-तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्या क्षेत्रातील गोरेगाव तालुक्यात ग्राम पिंडकेपार येथे पोटनिवडणूक तर तिरोडा तालुक्यातील ग्राम बोरगाव व चुरडी येथेही पोटनिवडणूक होत आहे.
- सहसराम कोरोटे, आमगाव-देवरी विधानसभा मतदारसंघ
- आमगाव-सालेकसा व देवरी तालुक्यांचा समावेश असलेल्या विधानसभा क्षेत्रातील आमगाव तालुक्यातील जांभूरटोला येथे सार्वत्रिक तर वडद येथे पोटनिवडणूक होणार आहे. सालेकसा तालुक्यातील तिरखेडा व पाऊलदौना तसेच देवरी तालुक्यातील मेहताखेडा, कन्हाळगाव व बोरगाव-बाजार येथे पोटनिवडणूक होत आहे.
- मनोहर चंद्रिकापुरे, अर्जुनी-मोरगाव विधानसभा मतदारसंघ
- सडक-अर्जुनी, अर्जुनी-मोरगा व गोरेगाव तालुक्यातील काही भाग असलेल्या अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्रातील सडक-अर्जुनी तालुक्यातील श्रीरामनगर येथे सावत्रिक निवडणूक होत आहे. तर अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील येरंडी-देवलगाव येथे सार्वत्रिक तसेच कुंभीटोला येथे पोटनिवडणूक होत आहे.
तालुकानिहाय निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायती
तालुका - सार्वत्रिक - पोटनिवडणूक
गोदिया - ०१ - ००
देवरी - ०० - ०३
तिरोडा - ०० - ०२
अर्जुनी-मोरगाव - ०१ - ०१
गोरेगाव - ०० - ०१
आमगाव - ०१ - ०१
सडक-अर्जुनी - ०१ - ००
सालेकसा - ०० - ०२