कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक; गोंदिया जिल्ह्यात दोन भाजप, एक अपक्ष तर एका ठिकाणी फिफ्टी फिफ्टी
By अंकुश गुंडावार | Published: April 29, 2023 06:05 PM2023-04-29T18:05:31+5:302023-04-29T18:06:47+5:30
Gondia News गोंदिया जिल्ह्यातील चार बाजार समित्यांची निवडणुकीची मतमोजणी शनिवारी (दि.२९) करण्यात आली. यात दोन तिरोडा आणि आमगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपने स्पष्ट बहुमत मिळविले. तर चाबी (अपक्ष) व काँग्रेसने १४ संचालक निवडून आणत बहुमत प्राप्त केले.
गोंदिया : जिल्ह्यातील चार बाजार समित्यांची निवडणुकीची मतमोजणी शनिवारी (दि.२९) करण्यात आली. यात दोन तिरोडा आणि आमगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपने स्पष्ट बहुमत मिळविले. तर गोंदिया कृषी उत्पन्न बाजार समितीत चाबी (अपक्ष) व काँग्रेसने १४ संचालक निवडून आणत बहुमत प्राप्त केले.
अर्जुनी मोरगाव बाजार समितीत मतदारांनी फिफ्टी फिफ्टी असा कौल दिल्याने येथे भाजपचे ९ आणि महाविकास आघाडीचे ९ संचालक निवडून आले. त्यामुळे या ठिकाणी कोण सत्ता स्थापन करतो हे फोडाफोडीच्या राजकारणानंतर स्पष्ट होणार असल्याची चर्चा आहे. गोंदिया जिल्ह्यात आमगाव, देवरी, गोरेगाव, तिरोडा, सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव अशा एकूण ७ कृषी उत्पन बाजार समित्यांची निवडणूक जाहीर झाली होती. यापैकी देवरी कृषी उत्पन बाजार समितीची निवडणूक बिनविरोध पार पडली. या बाजार समितीत सर्व १८ संचालक भाजपचे निवडून आले. तर सडक अर्जुनी आणि गोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीची मतमोजणी रविवारी (दि.३०) होणार आहे. विशेष म्हणजे गोंदिया कृषी उत्पन्न बाजार समितीत तब्बल १२ वर्षानंतर परिवर्तन घडून आले आहे. आ. विनोद अग्रवाल यांच्या चाबी संघटनेने काँग्रेसला सोबत घेवून परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून १४ संचालक निवडून आणत सत्ता स्पष्ट बहुमताने सत्ता स्थापन केली आहे.
.................................
असे आहे बाजार समिती निहाय बलाबल
बाजार समिती पक्षीय बलाबल
गोंदिया भाजप -३, शिवसेना (ठाकरे गट) -१, चाबी व काँग्रेस - १४
अर्जुनी मोरगाव भाजप -९, शिवेसना (ठाकरे गट)-१, काँग्रेस-४, राष्ट्रवादी काँग्रेस-४
तिरोडा भाजप- १०, काँग्रेस-३, राष्ट्रवादी काँग्रेस-४, अपक्ष-१
आमगाव भाजप व राष्ट्रवादी- १४, काँग्रेस -४