Nagar-panchayat-election-results-2022; गोंदिया नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसला कल; देवरी नगरपंचायतमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2022 05:59 PM2022-01-19T17:59:57+5:302022-01-19T18:02:06+5:30
गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव आणि देवरी या तीन नगरपंचायतींसाठी दोन टप्प्यात निवडणूक घेण्यात आली होती. यात तीनपैकी दोन नगरपंचायतींमध्ये मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या बाजूने कौल दिला असून, देवरी नगरपंचायतमध्ये भाजपला स्पष्ट कौल दिला आहे.
गोंदिया : जिल्ह्यातील सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव आणि देवरी या तीन नगरपंचायतींसाठी दोन टप्प्यात निवडणूक घेण्यात आली होती. त्याची मतमोजणी बुधवारी (दि. १९) करण्यात आली. यात तीनपैकी दोन नगरपंचायतींमध्ये मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या बाजूने कौल दिला असून, देवरी नगरपंचायतमध्ये भाजपला स्पष्ट कौल दिला आहे. सडक अर्जुनी आणि अर्जुनी मोरगाव नगरपंचायतमध्ये सत्तास्थापन करण्यासाठी अपक्ष उमेदवारांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
तीन नगरपंचायतींच्या एकूण ५१ जागांसाठी दोन टप्प्यात निवडणूक पार पडली. मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावत कौल दिला. देवरी नगरपंचायतच्या एकूण १७ जागांपैकी भाजपला ११, काँग्रेस ४, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नगरसेवक निवडून आले. या ठिकाणी भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्याने त्यांचीच सत्ता बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे, तर सडक अर्जुनी नगरपंचायतच्या एकूण १७ जागांपैकी भाजप १, राष्ट्रवादी काँग्रेस ७, काँग्रेस २, अपक्ष ३, बाहुबली पॅनल ३ आणि शिवसेनेचा १ उमेदवार निवडून आला आहे. त्यामुळे या नगरपंचायतमध्ये सत्तास्थापन करण्यासाठी राष्ट्रवादीला काँग्रेस अथवा अपक्ष उमेदवारांची मदत घ्यावी लागणार आहे, तर अर्जुनी मोरगाव नगरपंचायतच्या एकूण १७ जागांपैकी भाजप ७, काँग्रेस ४, अपक्ष १ आणि शिवसेनेचा १ उमेदवार निवडून आला आहे. या नगरपंचायतीत सत्तास्थापन करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला एकत्र येऊन सत्तास्थापन करता येणार आहे. स्थानिक नेते यावर काय निर्णय घेतात, यावरच सत्तेचे समीकरण अवलंबून आहे.
अपक्ष जागा वाढल्या
नगरपंचायत निवडणुकीत अपक्ष उमेदवारांच्या बाजूने मतदारांनी कौल दिला. त्यामुळे सत्तास्थापन करताना अपक्ष उमेदवारांची भूमिका महत्त्वपूर्ण राहणार आहे.
...........