अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात यश; लग्नगाठ बांधण्यापूर्वीच पोलीस मंडपात दाखल
By अंकुश गुंडावार | Published: March 3, 2023 10:41 AM2023-03-03T10:41:08+5:302023-03-03T10:55:30+5:30
दामिनी पथकाला जिल्ह्यातील एका गावामध्ये १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा बालविवाह ०२/०३/२०२३ रोजी आयोजित करण्यात आल्याची माहिती मिळाली.
गोंदिया - गोंदिया ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या एका गावात अल्पवयीन मुलीचा विवाह सोहळा होत असल्याची माहिती कळताच दामिनी पथक,महिला व बालविकास विभागाचे जिल्हा बाल सरंक्षण कक्ष आणि गोंदिया ग्रामीण पोलिसांच्या पथकाने सदरस्थळी दाखल होत १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे होत असलेले लग्न थांबवले.
दामिनी पथकाला जिल्ह्यातील एका गावामध्ये १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा बालविवाह ०२/०३/२०२३ रोजी आयोजित करण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार दामिनी पथक , पोलीस स्टेशन गोंदिया ग्रामीण , महिला व बाल विकास विभाग जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांनी संयुक्तपणे सदर ठिकाण गाठले असता विवाहाची पूर्वतयारी सुरु असल्याचे दिसून आले. लग्न मंडप उभारण्यात आला होता. मुलीची योग्य ती चौकशी केली असता ती मुलगी १६ वर्ष ०२ महिन्याची असल्याचे निदर्शनास आल्याने मुलीचे व मुलाचे पालकांना समुपदेशन करून सदर नियोजित विवाह रद्द करण्यात आला.
सदर मुलीला महिला बालकल्याण समिती समोर हजर करुन मुलीसह तिच्या आईला समुपदेशन करण्यात आले.सदरची कारवाई पोलीस अधिक्षक निखील पिंगळे , अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, यांचे मार्गदर्शनाखाली दामिनी पथकचे मपोउपनि प्रियंका पवार , पोशि राजेंद्र अंबादे , रमेंद्र बावनकर मपोशि निशा बंसोड , पुनम मंजुटे , नेहा पाचे पोलीस स्टेशन गोंदिया ग्रामिणचे सपोनि आसाराम चव्हान,सहा पोउपनि प्रदिप गणवीर,पोशि दिपक लिल्हारे,राकेश इंदुरकर आणि महिला व बाल विकास विभाग जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे गजानन गोबाडे,रेखा बघेले,मनिषा मोहुले,कपील टेंभुरकर, भागवत सुर्यवंशी यांनी संयुक्तपणे कार्यवाही करून सदर बालविवाह थांबविल्याने वरिष्ठांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक केले आहे.