सालेकसा नगरपंचायतमध्ये ना मुख्याधिकारी, ना पदाधिकारी, कारभार वाऱ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 04:20 PM2023-02-27T16:20:28+5:302023-02-27T16:21:51+5:30

नागरिकांनी व्यथा मांडावी कोणाकडे?

In Salekasa Nagar Panchayat neither the chief officer, nor the office bearers; work affected | सालेकसा नगरपंचायतमध्ये ना मुख्याधिकारी, ना पदाधिकारी, कारभार वाऱ्यावर

सालेकसा नगरपंचायतमध्ये ना मुख्याधिकारी, ना पदाधिकारी, कारभार वाऱ्यावर

googlenewsNext

विजय मानकर

सालेकसा (गोंदिया) : येथील नगरपंचायतमध्ये एकीकडे मागील दोन वर्षांपासून नियमित मुख्याधिकारी नाही. त्यात नगराध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपला असून कार्यकाळ संपण्याआधी निवडणुका न झाल्यामुळे आता नगरपंचायतचे कामकाज वाऱ्यावर चालत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे शहरातील सर्वसामान्य नागरिकांनी आपली व्यथा कोणाकडे मांडावी, असा प्रश्न निर्माण झालेला आहे.

२०१५ मध्ये सालेकसा ग्रामपंचायतला नगरपंचायत घोषित करण्यात आले. परंतु नगरपंचायतचा परिसर शहराबाहेर असून सालेकसा मुख्यालयासह सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालये व मुख्य बाजारपेठ आमगाव खुर्द ग्रामपंचायतच्या हद्दीत असल्याने आमगाव खुर्दलाही नगरपंचायतमध्ये समाविष्ट करण्याची मागणी होऊ लागली. हे प्रकरण शासन दरबारी व कोर्टापर्यंत पोहोचले. दरम्यान, प्रकरण निकाली लागण्याआधीच नगरपंचायतची २०१७ मध्ये पहिली निवडणूक झाली. लोकशाही पद्धतीने नगरपंचायतवर सत्ता स्थापन करण्यात आली. परंतु आमगाव खुर्दला समाविष्ट करण्यासाठी आणखी तीव्र आंदोलन करण्यात आले.

शेवटी शासनाने आमगाव खुर्दला नगरपंचायतमध्ये समाविष्ट केले, परंतु प्रतिनिधित्व देण्यात आले नाही. नव्याने निवडणुका घेऊन संयुक्त नगरपंचायतची सत्ता स्थापन करण्याची मागणी करण्यात आली. ती सुद्धा शासनाने पूर्ण केली नाही. त्यामुळे नगरपंचायतमध्ये निवडून आलेले नगराध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना आमगाव खुर्दची जबाबदारी सुद्धा देण्यात आली. परंतु आमगाव खुर्दकडे हवे तेवढे लक्ष दिले जात नाही, अशी तक्रार आमगाव खुर्दवासी सतत करीत राहिले. दरम्यान, नगरपंचायतमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वाद निर्माण होत असल्याने मुख्याधिकारी नियमितपणे टिकून राहिले नाही. याचा परिणाम विकास कामावर होत राहिला. मुख्याधिकाऱ्यांअभावी कारभार कधी दुसऱ्या तालुक्यातील मुख्याधिकाऱ्यांकडे देण्यात आला तर कधी तहसीलदारांकडे अतिरिक्त कारभार देण्यात आला. यामुळे नगरपंचायतचा हवा तसा विकास होऊ शकला नाही.

तहसीलदारही गेले सुट्टीवर

- १२ जानेवारी रोजी नगरपंचायतचा पहिला कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे नगराध्यक्ष व विषय समिती सभापती आणि नगरसेवकांचाही कार्यकाळ पूर्ण झाला असून निवडणुका न झाल्याने प्रशासकराज आले आहे. परंतु मागील दोन वर्षांपासून नियमित मुख्याधिकारी सुद्धा नाहीत. दीड महिन्यापासून एकीकडे पदाधिकारी तर नाहीच, दुसरीकडे नियमित मुख्याधिकारी नसून मुख्याधिकाऱ्यांचा कारभार येथील तहसीलदारांकडे देण्यात आला आहे. परंतु तहसीलदार सुद्धा मागील दीड महिन्यापासून कौटुंबिक कारणामुळे सुटीवर असल्यामुळे तहसीलदारांचा प्रभार नायब तहसीलदारांकडे देण्यात आला आहे. अशात नगरपंचायतकडे सपशेल दुर्लक्ष होत असल्याचे चित्र निर्माण झाले असून, प्रशासनाने येथील नगरपंचायतला वाऱ्यावर सोडले असल्याचे दिसून येत आहे.

दोन नियमित व काही कंत्राटी कर्मचारी

- नगरपंचायतचा कार्यकाळ संपला, त्याआधी निवडणूक होऊन पुन्हा सत्ता स्थापन होईल, अशी अपेक्षा केली जात होती. परंतु निवडणूक घेण्यापूर्वी आमगाव खुर्दला विलीन करून नव्याने प्रभाग रचना करण्याची प्रक्रिया करावी लागलेली ती प्रक्रिया सुद्धा आतापर्यंत झालेली नाही. तसेच निवडणूक केव्हा घेण्यात येईल हे सुद्धा स्पष्ट नाही. त्यामुळे नगरपंचायत पदाधिकाऱ्यांविना चालत असून कारभार तहसीलदारांकडे देण्यात आला आहे. परंतु तहसीलदार सुद्धा सुटीवर आहेत. यामुळे दोन-तीन नियमित कर्मचारी आणि काही कंत्राटी कर्मचारी कामकाज पाहत असून जनता किंवा शहरातील समस्यांकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे.

Web Title: In Salekasa Nagar Panchayat neither the chief officer, nor the office bearers; work affected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.