पुलाअभावी गावकऱ्यांचा जीव धोक्यात घालून होतो प्रवास !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 05:14 PM2024-07-08T17:14:02+5:302024-07-08T17:23:40+5:30

संवेदनशील प्रशासनः दुर्गम भागातील नागरिकांची व्यथा

In the absence of a bridge, the villagers travel at risk! | पुलाअभावी गावकऱ्यांचा जीव धोक्यात घालून होतो प्रवास !

In the absence of a bridge, the villagers travel at risk!

गोंदिया : देवरी तालुक्यातील चुंबली हे २५० लोकवस्तीचे गाव आहे. या गावकऱ्यांना ये-जा करण्यासाठी अद्यापही रस्ता नाही शिवाय चुंबली नदीवर पूल नसल्याने पावसाळ्यात त्यांचा तालुक्याशी संपर्क तुटतो. दोन वर्षांपूर्वी या समस्येचे गांर्भिय प्रशासनाला कळावे यासाठी येथील गावकऱ्यांनी आंदोलन उभारले. या आंदोलनाची दखल घेत तत्कालीन पोलिस अधीक्षक आणि आ. सहषराम कोरोटे यांनी चिखल तुडवीत चार किमीचा प्रवास करून या गावकऱ्यांची व्यथा जाणून घेतली होती. त्यानंतर त्यांनी वर्षभरात पूल आणि रस्ता तयार करून देण्याची ग्वाही गावकऱ्यांना दिली होती. यामुळे गावकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या, मात्र माशी कुठे शिंकली कुणास ठाऊक ना रस्ता झाला ना पूल त्यामुळे गावकऱ्यांना पुन्हा आंदोलनाचा पावित्रा घ्यावा लागला.


५ जुलै रोजी चुंबली येथील गावकऱ्यांनी नदीच्या पात्रात धरणे आंदोलन करून शासन आणि प्रशासनाला त्यांच्या समस्येची जाणून करून दिली. तसेच विधानसभा निवडणुकी पूर्वी रस्ता आणि चुंबली नदीवरील पुलाची समस्या मार्गी लागली नाही तर, गावकऱ्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला. मागील आठ दहा वर्षांच्या कालावधीत चुंबली येथील गावकऱ्यांनी त्यांच्या मागणीसाठी अनेकदा आंदोलने केली. पण प्रत्येकवेळी त्यांना कोरड्या आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही. शासन आणि प्रशासन आदिवासी दुर्गम भागातील नागरिकांची आम्हाला जाणीव असल्याचे सांगत असले तरी प्रत्यक्षात मात्र ते संवेदनाहिन असल्याचे चुंबलीवासीयांच्या कायम असलेल्या प्रश्नावरून दिसून येत. संवेदनाहिन शासन आणि प्रशासनामुळे चुंबलीवासीयांना जीव धोक्यात घालून दररोज प्रवास करावा लागत आहे.


जिल्ह्याचा सर्वांगीण विकास झाला असा दावा शासन आणि प्रशासनाकडून केला जात असला तरी तो पूर्णपणे फोल असल्याचे आदिवासी दुर्गम भागातील रस्ते, पूल आणि पायभूत सुविधांचा अभाव यावरून दिसून येते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना एकीकडे ये-जा करण्यासाठी रस्ता आणि नदीवर पूल नसल्याने जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागावा यापेक्षा मोठे दुर्दैव काय असेच म्हणण्याची वेळ देवरी तालुक्यातील चुंबली येथील गावकऱ्यांवर आली आहे. नदीवर पूल नसल्याने गावकऱ्यांना पावसाळ्यात जीव धोक्यात घालून नदीच्या पाण्यातून ये-जा करावी लागत असल्याचे भयावह चित्र आहे. पण संवेदनाहिन शासन आणि प्रशासनाला अद्यापही याचे गांर्भिय कळले नाही.


ना रस्ता ना नदीवर पूल
नक्षलग्रस्त, जंगल व्याप्त व आदिवासी बहुल असलेल्या मगरडोह ग्रामंपचायत हद्दीतील चुंबली गावात ना रस्ता ना नदीवर पूल आहे. ज्यामुळे दरवर्षी नदी पार करताना अनेकदा जीव गमवावा लागतो. गेल्यावर्षी या नदीतून रोजगारासाठी दुसऱ्या गावाला जात असताना नदी पार करताना नाव उलटल्याने पाच महिलांना जीवाला मुकावे लागले होते. पण यानंतरही प्रशासनाला त्यांच्या समस्येची जाणीव झाली नाही. त्यामुळे प्रशासनाला अजून किती बळींची प्रतीक्षा आहे सवाल गावकरी करीत आहे. तर प्रशासनाकडून पुन्हा यावर तोडगा काढण्यासाठी ९ जुलैला देवरी उपविभागीय कार्यालयात बैठक बोलविली आहे. त्यामुळे यात काय ठोस मार्ग काढला जातो की पुन्हा आश्वासनाचे गाजर दिले जाते हे महत्वपूर्ण ठरणार आहे.


 

Web Title: In the absence of a bridge, the villagers travel at risk!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.