जिल्ह्यात यंदा ८० हजार हेक्टर क्षेत्रात धानाचे नियोजन, उन्हाळी हंगामासाठी शेतकरी लागले कामाला
By कपिल केकत | Published: February 22, 2024 09:36 PM2024-02-22T21:36:49+5:302024-02-22T21:37:11+5:30
यातील २१ हजार १०१ हेक्टरमध्ये आतापर्यंत धानाची रोवणी झाली आहे. उन्हाळी धान रोवणीसाठी शेतकरी जोमाने कामाला लागलेला दिसून येत आहे.
गोंदिया : रब्बीचा हंगाम संपला असून, आता उन्हाळ्यासाठी शेतकरी कंबर कसून कामाला लागला आहे. जिल्ह्यात धानाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जात असल्याने सर्वाधिक क्षेत्र धानाचेच असते व यंदा जिल्ह्यात ८० हजार हेक्टर क्षेत्रात उन्हाळी धानाचे नियोजन करण्यात आले आहे. यातील २१ हजार १०१ हेक्टरमध्ये आतापर्यंत धानाची रोवणी झाली आहे. उन्हाळी धान रोवणीसाठी शेतकरी जोमाने कामाला लागलेला दिसून येत आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक धान आहे. यामुळेच जिल्ह्यात सर्वाधिक धानशेती केली जात असून, धानाचे भरघोस उत्पादन घेतले जात असल्याने गोंदिया जिल्ह्याला धानाचे कोठार म्हटले जाते. आता रब्बीचा हंगाम संपला आहे. तर मागील वर्षी बरसलेल्या दमदार पावसामुळे पाटबंधारे विभागाकडून उन्हाळीसाठी पाणी दिले जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांची उन्हाळी धान पीक घेण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. जिल्ह्यात धानाचे सर्वसाधारण क्षेत्र ४३ हजार ११२.६८ हेक्टर असून, मागील वर्षी जिल्ह्यात तब्बल ७६ हजार ६९१ हेक्टरमध्ये शेतकऱ्यांनी धानाची रोवणी केली होती. यामुळे यंदा कृषी विभागाने ८० हजार हेक्टर क्षेत्रात उन्हाळी धानाचे नियोजन केले आहे. दिवाळी आटोपली असून, ग्रामीण भागातील मंडईचा काळही लोटला असल्याने शेतकरी पुन्हा नव्या जोशात उन्हाळी हंगामासाठी सज्ज झाला आहे. हेच कारण आहे की, आता २१ हजार १०१.२६ हेक्टर क्षेत्रात धानाची रोवणी झाली आहे.
सडक-अर्जुनी तालुका आघाडीवर
- जिल्ह्यात आतापर्यंत २१ हजार १०१.२६ हेक्टरमध्ये उन्हाळी धानाची रोवणी झाली आहे. यात सडक-अर्जुनी तालुक्यात आतापर्यंत सर्वाधिक सहा हजार ८२० हेक्टरमध्ये रोवणी आटोपली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर अर्जुनी-मोरगाव तालुका असून, येथे चार हजार ५२३ हेक्टरमध्ये धानाची रोवणी आटोपली आहे.
५९८१ हेक्टरमध्ये रोपवाटिका
- जिल्ह्यात ५९८१.१४ हेक्टर क्षेत्रात रोपवाटिका लावण्यात आल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक एक हजार ३३९.८८ हेक्टर क्षेत्रात अर्जुनी-मोरगाव तालुक्यात रोपवाटिका लावण्यात आल्या आहेत. त्यानंतर सडक-अर्जुनी तालुक्यात एक हजार १०१ हेक्टर क्षेत्रात रोपवाटिका लावण्यात आल्या आहेत. यावरून रोवणी असो वा रोपवाटिका अर्जुनी-मोरगाव व सडक-अर्जुनी तालुकाच आघाडीवर राहतो, असे दिसून येते.
जिल्ह्यातील उन्हाळी धान रोवणी क्षेत्र -
तालुका- क्षेत्र (हेक्टरमध्ये)
गोंदिया- ५६५
गोरेगाव- १५०७
तिरोडा- १३१६.३६
अर्जुनी-मोरगाव- ४५२३
देवरी- २१३७.९०
आमगाव- २७४०
सालेकसा- १४९२
सडक-अर्जुनी- ६८२०
एकूण- २१,१०१.२६
जिल्ह्यातील रोपवाटिकांची स्थिती
तालुका- क्षेत्र (हेक्टरमध्ये)
गोंदिया- ७८६
गोरेगाव- १५०७
तिरोडा- १३१६.३६
अर्जुनी-मोरगाव- १३३९.८८
देवरी- ३७२.९०
आमगाव- ७४२.७०
सालेकसा- ५५०
सडक-अर्जुनी- ११०१
एकूण- ५९८१.१४