परीक्षेत एकावर एक सात अंतर्वस्त्रात मोबाईल लपवून केली कॉपी, अखेर फसलाच

By नरेश रहिले | Published: January 14, 2024 05:19 PM2024-01-14T17:19:03+5:302024-01-14T17:19:50+5:30

ब्लू टूथद्वारे परीक्षेत गैरप्रकार करण्याचा त्याचा प्लान मात्र काही वेळातच उघडकीस आला. त्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

In the exam, one by one, seven undergarments hid the mobile phone and copied it | परीक्षेत एकावर एक सात अंतर्वस्त्रात मोबाईल लपवून केली कॉपी, अखेर फसलाच

परीक्षेत एकावर एक सात अंतर्वस्त्रात मोबाईल लपवून केली कॉपी, अखेर फसलाच

गोंदिया : कॉपी करून पास होणाऱ्या बहाद्दरांची आपल्याकडे काही कमी नाही. कॉपी करण्यासाठी अनेक युक्त्या त्यांच्याकडे असतात अशीच एक घटना राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून घेण्यात आलेल्या विविध पदांच्या भरती परीक्षेत उघडकीस आली. एका तरुणाने एकावर एक अशी तब्बल सात अंतर्वस्त्रे घालून त्यात मोबाइल लपवून आणला. ब्लू टूथद्वारे परीक्षेत गैरप्रकार करण्याचा त्याचा प्लान मात्र काही वेळातच उघडकीस आला. त्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिरोडा येथील राजीव गांधी आयटीआय येथे राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे शनिवारी (दि.१३) दुपारी २:३० ते ३:३० वाजतादरम्यान भरती परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत औरंगाबाद जिल्ह्यातील ग्राम टाकळी येथील आरोपी धीरज महासिंह सुंदर्डे (१९) याने चक्क एकावर एक सात अंतर्वस्त्रे घालून त्यामध्ये मोबाइल लपवून ठेवला होता. परीक्षेत धीरज सुंदर्डे याच्या संशयास्पद हालचाली सुरू असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक अतुल पुरणलाल बन्सोडे (४०) यांना संशय आला. त्यांनी त्याच्यावर पाळत ठेवली.

इअरफोनच्या माध्यमातून परीक्षेतील प्रश्नांची उत्तरे तो दुसऱ्याकडून मागवीत असल्याचे पाहून अतुल बन्सोडे यांनी त्याला रंगेहात पकडले. त्याला दुसऱ्या खोलीत बोलावून त्याची झडती घेतली असता, त्याने पॅन्टच्या आत एकावर-एक अशा सात अंडरविअर घातल्या होत्या. त्याला तपासले असता, त्याच्याजवळ चार हजार रुपये किमतीचा मोबाइल, ब्लूटूथ डिवाइस व इअरफोन असा ५ हजार २०० रुपयांचा माल आढळून आला. धीरज सुंदर्डे विरुद्ध केलेल्या तक्रारीत तिरोडा पोलिसांनी महाराष्ट्र विद्यापीठ बोर्ड आणि इतर नमूद परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरव्यवहारांना प्रतिबंध अधिनियम १९८२ चे कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस हवालदार टेंभरे करीत आहेत.
-----------------.......
मेटल डिटेक्टरने शोधला मोबाइल
- धीरज सुंदर्डे हा परीक्षेला बसला असता, त्याच्या हालचाली बघून एम.एस.एफ. या कंपनीतील एक महिला व दोन पुरुष कर्मचाऱ्यांना त्याच्यावर संशय आला. ते पाळत ठेऊन असतानाच त्यांचा संशय बळावला व त्यांनी या प्रकरणाची माहिती अतुल बन्सोडे यांना दिली. तेव्हा त्यांनी धीरज सुंदर्डे याची मेटल डिटेक्टरद्वारे व प्रत्यक्ष अंगझडती घेतली असता, त्याने परिधान केलेल्या सात अंडरविअरच्या आत मोबाइल आढळून आला.

Web Title: In the exam, one by one, seven undergarments hid the mobile phone and copied it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :examपरीक्षा