जिल्ह्यातील पहिल्या पूर्णत: डिजिटल शाळेचे उद्घाटन
By admin | Published: February 27, 2016 02:05 AM2016-02-27T02:05:59+5:302016-02-27T02:05:59+5:30
लोकवर्गणीच्या माध्यमातून ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानयुक्त शिक्षण देण्याच्या प्रेरणेतून जि.प. पूर्व माध्यमिक शाळा हिरडामालीला पूर्णत: डिजिटल करण्यात आले.
गोरेगाव : लोकवर्गणीच्या माध्यमातून ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानयुक्त शिक्षण देण्याच्या प्रेरणेतून जि.प. पूर्व माध्यमिक शाळा हिरडामालीला पूर्णत: डिजिटल करण्यात आले.
उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते, जि.प. अध्यक्ष उषा मेंढे यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले. अतिथी म्हणून जि.प. चे मुख्य कायकारी अधिकारी दिलीप गावडे, शिक्षण सभापती पी.जी. कटरे, महिला व बालकल्याण सभापती विमल नागपुरे, कृषी व पशुसंवर्धन सभापती छाया दसरे, खुशाल बोपचे, हेमंत पटले, पं.स. सभापती दिलीप चौधरी, शिक्षणाधिकारी उल्हास नरड, डायट अधिव्याख्याता राजेश रूद्रकार, गटशिक्षणाधिकारी यशवंत कावळे, सरपंच कुंता बघेले उपस्थित होते.
याप्रसंगी मान्यवरांनी शाळेच्या चित्रफितीचे अवलोकन केले. डिजिटल शाळा संकल्पनेतून विद्यार्थ्यांना टॅबची सोय, प्रोजेक्टर, एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून शिक्षण देण्याचे काम सुरू आहे. पहिली ते सातवीचे वर्ग डिजिटल करणारी ही जिल्ह्यातील पहिली शाळा ठरली. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी तंत्रज्ञानयुक्त शिक्षण शाळा गावकऱ्यांच्या माध्यमातून साकार झाल्याचे बघून आनंद व्यक्त केला. दृकश्राव्य माध्यमातून मिळणारे शिक्षण चिरकाल टिकणारे असते. तसेच प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत हिरडामाली शाळेने राज्यभर ओळख निर्माण करून जिल्ह्याचा गौरव वाढविला, असे उद्गार व्यक्त केले.
याप्रसंगी सर्व मान्यवरांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार केला. तसेच विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)