उद्घाटन झाले, मात्र धान खरेदीचा मुहूर्त मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:23 AM2021-05-30T04:23:40+5:302021-05-30T04:23:40+5:30
गोरेगाव : रब्बी हंगामातील धान खरेदी करण्यासाठी विविध संस्थांद्वारे आधारभूत धान खरेदी केंद्राचे उद्घाटन आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या हस्ते करण्यात आले ...
गोरेगाव : रब्बी हंगामातील धान खरेदी करण्यासाठी विविध संस्थांद्वारे आधारभूत धान खरेदी केंद्राचे उद्घाटन आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या हस्ते करण्यात आले आहे. मात्र, गोदाम आणि बारदानाअभावी धान खरेदीला सुरुवात करण्यात आली नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना व्यापारी व दलाल हाच पर्याय असून आपले धान त्यांना कमी दरात विक्री करावे लागत आहे.
अर्जुनी-मोरगाव विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या ग्राम तिल्ली, मोहगाव, चोपा, तेढा, मोहाडी, गिधाडी या गावांत विविध संस्थांची धान खरेदी केंद्रे सुरू झाली. परंतु, धान खरेदीचा मुहूर्त सापडला नाही. बारदानाअभावी केंद्रे पांढरा हत्ती ठरली आहेत. ग्राम कुऱ्हाडी व कवलेवाडा येथे धान खरेदी केंद्रे सुरू झाली. मात्र, बारदाना व गोदामाअभावी तेथेही खरेदी सुरू झाली नाही. चिचगाव येथील संस्थेद्वारे ढिवरटोली येथील धान खरेदी केंद्रात उपलब्ध जुना बारदाना असल्याने अंशत: खरेदी सुरू करण्यात आल्याचे बोलले जात आहे. धान खरेदी केंद्रावर शासकीय दराने किंमत शेतकऱ्यांना देण्यात येत असली तरी बारदाना व गोदामाअभावी खरेदीस सुरुवात केली जात नाही. त्यामुळे शेतकरी व्यापाऱ्यांना कमी किमतीत धान विकत आहेत.
एकीकडे सरकार शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी विविध घोषणा करीत असले तरी या योजनांची अधिकारी अंमलबजावणी करीत नसल्याचे दिसते. खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात आधारभूत किमतीत धान खरेदी करण्यात आली. या धानाची उचल झाली नसल्याने गोदामे रिकामी झाली नाहीत. त्यामुळे जागेअभावी शेतकरी खरेदी-विक्री संस्थेला संस्थेमार्फत केंद्र उभारण्यासाठी वाट पहावी लागत आहे. दरम्यान, रब्बी धानाची खरेदी तत्काळ सुरू करण्यात यावी, आर्थिक लूट थांबवावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.