म्युकरमायकोसिसचा विळखा वाढतोय; वेळीच काळजी घ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:31 AM2021-05-27T04:31:02+5:302021-05-27T04:31:02+5:30

गोंदिया : कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना आता म्युकरमायकोसिस या आजाराचा धोका सतावत आहे. त्यामुळे या आजाराची लक्षणे दिसताच डॉक्टरांचा ...

The incidence of myocardial infarction is increasing; Be careful on time! | म्युकरमायकोसिसचा विळखा वाढतोय; वेळीच काळजी घ्या!

म्युकरमायकोसिसचा विळखा वाढतोय; वेळीच काळजी घ्या!

Next

गोंदिया : कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना आता म्युकरमायकोसिस या आजाराचा धोका सतावत आहे. त्यामुळे या आजाराची लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घेऊन वेळीच उपचार करण्याची गरज आहे. म्युकरमायकोसिस संसर्ग असलेले रुग्ण सध्या जिल्ह्यामध्ये आढळत आहेत. वेळेत निदान व उपचार झाल्यास म्युकरमायकोसिस पूर्ण बरा होतो. म्युकरमायकोसिस या आजाराच्या रुग्णांवर महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार करण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंमरीश मोहबे यांनी दिली. या आजारासाठी जिल्हा नोडल अधिकारी म्हणून महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. जयंती पटले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रसिद्ध नाक, कान, घसा तज्ज्ञ डॉ. गौरव अग्रवाल हे शासकीय मेडिकल कॉलेजचे नोडल ऑफिसर म्हणून काम पाहत आहेत. त्यामुळे या आजारासंबंधी उपचार करावयाचे असल्यास रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना यांच्याशी संपर्क साधता येणार आहे.

...................

म्युकरमायकोसिस काय आहे?

म्युकरमायकोसिस (काळी बुरशी/ब्लॅक फंगस) हा एक सामान्यत: दुर्मीळ असा बुरशीजन्य (फंगल इन्फेक्शन) आजार आहे. कोरोनाकाळात ह्या आजाराचे रुग्ण अचानक वाढल्यामुळे जनतेत भीतीचे वातावरण तयार झाले आहे. हा रोग प्रामुख्याने वैद्यकीय समस्या असणाऱ्या लोकांना प्रभावित करतो. त्यामुळे त्यांची रोगाविरुद्ध लढ्याची क्षमता कमी होते.

...................

म्युकरमायकोसिस कशामुळे होतो?

म्युकर नावाची बुरशी जमिनीत, खतांमध्ये, सडणाऱ्या फळांत व भाज्यांत तसेच हवेत आणि अगदी निरोगी व्यक्तींच्या नाकात आणि नाकाच्या स्रावातदेखील आढळते. ज्या व्यक्तींमध्ये रोगप्रतिकार शक्ती कमी होते, जसे कर्करोगाचे रुग्ण, एचआयव्ही बाधा असलेले रुग्ण, ज्यांचे अवयव प्रत्यारोपण झाले आहे असे रुग्ण अशांमध्ये म्युकरमायकोसिसची बाधा होण्याचे प्रमाण अधिक असू शकते.

..................

या रोगाचा अधिक धोका कोणाला आहे?

ज्यांना स्टेरॉईड औषधे दिली जात आहेत आणि त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी झाली आहे, ज्यांचा डायबेटीस अनियंत्रित आहे, ज्यांना कर्करोग आहे किंवा ज्यांचे नुकतेच अवयव प्रत्यारोपण झाले आहे, ज्यांना इम्युनमोड्युलेटर्स अर्थात रोगप्रतिकार शक्तीत फेरफार करणारी औषधे दिली जात आहेत, जे प्रदीर्घ काळ आयसीयू म्हणजे अतिदक्षता कक्षात दाखल आहेत, ज्यांना प्रदीर्घ काळापासून ऑक्सिजन थेरपी दिली जात आहे व ज्यांना जुनाट किडनी (मूत्रपिंड) किंवा लिव्हर (यकृत) आजार आहे अशांना या आजाराचा धोका अधिक आहे.

............

धोकादायक परिणाम टाळण्यासाठी या लक्षणांवर लक्ष ठेवा

डोळे दुखणे, डोळ्यांच्या बाजूला लाली येणे, नाक चोंदणे, सूज येणे, ताप येणे, डोके दुखणे, खोकला, दात-हिरड्या दुखणे, दात ढिले होणे, श्वास घेण्यास त्रास, दम लागणे, रक्ताची उलटी होणे व मानसिक स्थितीवर परिणाम.

..........

हे करा

रक्तातील साखरेची, एचबीएआयसीची तपासणी, रक्तातील साखरेवर काटेकोरपणे नियंत्रण, कोविड-१९ नंतर रक्तातील साखरेची पातळी आणि मधुमेह यांचे निरीक्षण करा, स्टेरॉईडचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणेच करा, घरी ऑक्सिजन घेतला जात असल्यास स्वच्छ ह्युमिडीफायरमध्ये निर्जंतुक पाण्याचाच वापर करा व अँटिबायोटिक्स अँटिफंगल औषधांचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करा.

........

हे करू नका

आजाराची चिन्हे आणि लक्षणे याकडे दुर्लक्ष करू नका, बंद असणारे नाक हे बॅक्टेरियल सायनुसायटिसमुळे असावे असा विचार करू नका. या आजाराची तपासणी करून घेण्यास आग्रही राहा, दुर्लक्ष करू नका व म्युकरमायकोसिस या आजारावर त्वरित उपचार करा. वेळ घालवू नका. म्युकरमायकोसिसची लक्षणे आढळल्यास तत्काळ आरोग्य विभागाशी संपर्क साधावा. या आजारावर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतून उपचार केले जातात, अशी माहिती निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी दिली आहे.

..................

जिल्ह्यात आढळले २८ रुग्ण

जिल्ह्यात आतापर्यंत म्युकरमायकोसिसचे २८ रुग्ण आढळले आहेत. यापैकी दोन रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तर २६ रुग्णांवर नागपूर आणि गोंदिया येथे उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: The incidence of myocardial infarction is increasing; Be careful on time!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.