..तर गोंदिया रेल्वे स्थानकावर होऊ शकते बल्लारशासारख्या घटनेची पुनरावृत्ती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2022 05:14 PM2022-11-29T17:14:10+5:302022-11-29T17:15:54+5:30
अरुंद पादचारी पुलामुळे होते गर्दी : प्रवाशांचा जीव धोक्यात; रेल्वे प्रशासनाची डोळेझाक
गोंदिया : रेल्वे स्थानकावरील पादचारी पूल कोसळून १७ जण गंभीर झाल्याची घटना रविवारी (दि.२७) चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशा रेल्वे स्थानकावर घडली. या घटनेमुळे रेल्वे स्थानकावरील जीर्ण झालेल्या पादचारी पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तर गोंदिया रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ५ वर तयार करण्यात आलेल्या अरुंद पादचारी पुलामुळे या पुलावर प्रवाशांची कोंडी होऊन हा पूल कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण याकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असल्याने येथेही बल्लारशासारख्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया रेल्वे स्थानक हे एक महत्त्वपूर्ण रेल्वे स्थानक आहे. या रेल्वे स्थानकावरून दररोज ७५ प्रवासी गाड्या धावतात. तर १५ हजारांवर प्रवासी दररोज ये-जा करतात. या रेल्वे स्थानकावर एकूण सहा फलाट असून सहाही फलाटांवर ये-जा करण्यासाठी पादचारी पुलाची व्यवस्था रेल्वे प्रशासनाने केली आहे. चार वर्षांपूर्वी फलाट क्रमांक पाच आणि सहावर जाण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पादचारी पूल तयार केला.
पादचारी पूल तयार करताना या पुलावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या विचारात घेणे आवश्यक होते. विशेष म्हणजे याच फलाटावर विदर्भ एक्सप्रेस, महाराष्ट्र एक्सप्रेससह काही लोकल आणि पॅसेंजर गाड्या सुद्धा थांबतात. या गाड्या गोंदियापर्यंतच असल्याने सर्वच प्रवासी येथेच उतरतात. त्यामुळे या पादचारी पुलावर एकाच वेळी प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यातच पादचारी पूल फारच अरुंद असल्याने अनेकदा या ठिकाणी प्रवाशांची कोंडी होते. तर पुलावर प्रवाशांची गर्दी वाढून हा पूल कोसळण्याची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही. या पादचारी पुलाचे रुंदीकरण करण्यात यावे अशी मागणी प्रवाशांनी अनेकदा रेल्वे विभागाकडे केली. पण त्यांनी याची अद्यापही दखल घेतली नसल्याने रेल्वे विभागाला बल्लारशासारख्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची प्रतीक्षा आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
बल्लारपूर रेल्वे पूल दुर्घटना: मृताच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत जाहीर
तांत्रिक विभागाची चूक
फलाट क्रमांक पाचवर चार वर्षांपूर्वी नवीन पादचारी पूल तयार करण्यात आला. पूल तयार करीत असताना या पुलावरुन ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या विचारात घेणे गरजेचे होते. पण रेल्वेच्या तांत्रिक विभागाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच अरुंद पुलामुळे अनेकदा या पुलावर प्रवाशांची कोंडी होते.
कोरोना गेला तरी दोन पादचारी पूल बंदच
रेल्वे प्रशासनाने गोंदिया रेल्वे स्थानकावरील दोन पादचारी पूल कोरोनाचे कारण देत बंद केले होते. याला आता दोन ते अडीच वर्षांचा कालावधी लोटला. मात्र, दोन्ही पादचारी पूल अद्यापही सुरू केले नाहीत. त्यामुळे प्रवाशांना दूरवरून फेरा मारून यावे लागत आहे. हे पादचारी पूल सुरू करण्यास रेल्वे विभागाला नेमकी अडचण काय हे कळण्यास मार्ग नाही.