डॉ सुगत चंद्रिकापुरे यांची घर वापसी; तीन नगरसेवकांसह राष्ट्रवादीत प्रवेश
By अंकुश गुंडावार | Published: February 22, 2024 12:46 PM2024-02-22T12:46:36+5:302024-02-22T12:46:54+5:30
सडक अर्जुनी येथील नगराध्यक्ष व नगर सेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता ते परत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अर्जुनी मोरगाव - अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे सुपुत्र डॉ सुगत यांनी तीन नगरसेवकांसह कोहमारा येथील पक्ष कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये गुरुवारी (२२) प्रवेश केला आहे. २६ मे २०२३ रोजी त्यांनी शिवसेना शिंदे गटात मुंबई येथे प्रवेश केला होता. त्यांच्या या घर वापसीमुळे विधानसभा क्षेत्रात पक्षाला बळकटी येणार आहे.
डॉ सुगत हे अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनी चे नगराध्यक्षांसह इतर १३ नगरसेवकांना सोबत घेऊन शिवसेनेत गेले होते. अवघ्या नऊ महिन्यातच त्यांनी घर वापसी केली आहे. गुरुवारी कोहमारा येथील एरिया ५१ येथे आमदार मनोहर चंद्रिकापुरे, माजी आमदार राजेंद्र जैन, राकाचे प्रदेश महासचिव गंगाधर परशुरामकर, सडक अर्जुनी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष डॉ अविनाश काशीवार, नगरसेवक दानेश साखरे यांचे उपस्थितीत अर्जुनी मोरगावच्या नगराध्यक्ष मंजुषा बारसागडे, बांधकाम सभापती सागर आरेकर व नगरसेविका दीक्षा शहारे यांचेसह डॉ सुगत चंद्रिकापुरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
सडक अर्जुनी येथील नगराध्यक्ष व नगर सेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता ते परत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यानच्या काळात डॉ सुगत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कडून मतदार संघाच्या विकासासाठी अमाप निधी आणला असल्याचे बोलले जात आहे.त्यांच्या घर वापसी मुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गोटात आनंद व्यक्त केला जात आहे.