मतदार यादीमध्ये बोगस मतदारांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 01:06 AM2017-09-07T01:06:54+5:302017-09-07T01:07:05+5:30
तिरोडा तालुक्यातील ग्रामपंचायत पिपरिया येथील ग्रामपंचायत निवडणूकीच्या मतदार यादीमध्ये बोगस मतदारांचा समावेश असल्याची बाब उघडकीस आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
इंदोरा (बु.) : तिरोडा तालुक्यातील ग्रामपंचायत पिपरिया येथील ग्रामपंचायत निवडणूकीच्या मतदार यादीमध्ये बोगस मतदारांचा समावेश असल्याची बाब उघडकीस आली आहे. बोगस मतदारांचा समावेश असलेली यादी रद्द करुन नव्याने जाहीर न केल्यास होवू घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा गावकºयांनी दिला आहे.
जे मतदार गावात ३० वर्षांपासून राहत नाही व ज्यांचे आधारकार्ड नाही. तसेच स्वस्त धान्य दुकानात यादीत नाव नाही. त्यांचीही नावे ग्रामपंचायत पिपरिया गावातील वार्ड क्र.३ च्या मतदार यादीमध्ये समाविष्ट आहेत. हा प्रकार गावातील नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी याची जिल्हा निवडणूक अधिकारी गोंदिया व तालुका निवडणूक अधिकारी तिरोडा यांच्याकडे तक्रार केली आहे. मतदार यादीतील घोळ दूर करण्याची मागणी केली आहे.
पिपरिया येथील वार्ड क्र.३ च्या ग्रा.पं. मतदार यादीमध्ये २७८ मतदारांचा समावेश आहे. यात पुरुष १३३ व महिला १४५ असा समावेश आहे. या २७८ मतदारांमध्ये एकूण ४९ मतदार बोगस असल्याचा गावकºयांचा आरोप आहे. २५ ते ३० वर्षापासून या गावातच राहत नाही. त्या ४९ मतदारांच्या नावाचा समावेश वार्ड क्र.३ च्या मतदार यादीमध्ये केला आहे.
शासनाच्या नियमानुसार गावातील नागरिकांनी बोगस नावावर पुराव्यासहित आक्षेप नोंदवून सुद्धा निवडणूक अधिकारी यावर कार्यवाही का करीत नाही.
बोगस मतदार जे या गावातच राहत नाही याचा सबळ पुरावा सरपंच ग्रामपंचायत पिपरिया तसेच स्वस्त धान्य दुकानदार यांनी लेखी देऊन सुद्धा निवडणूक अधिकारी ग्रामस्थांची दिशाभूल करीत असल्याचा गावकºयांचा आरोप आहे. जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी या प्रकराची गांभीर्याने दखल घेवून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पडताळणी दरम्यान उघडकीस
२८ आॅगस्ट २०१७ ला निवडणूक अधिकारी तिरोडा यांनी ग्रामपंचायतला मतदार यादी पळताळणीसाठी नोटीस बोर्डावर लावली. तेव्हा नागरिकांच्या लक्षात आले की वार्ड क्रमांक ३ मध्ये बोगस नावाचा समावेश आहे. गावातील नागरिकांनी या मतदार यादीवर आक्षेप घेऊन जिल्हा निवडणूक अधिकारी गोंदिया व तालुका निवडणूक अधिकारी तिरोडा यांना निवेदनाद्वारे माहिती दिली. ४९ बोगस मतदारांच्या नावांमध्ये ३४ मतदारांमध्ये बालाघाट, खैरलांजी व गोंदिया लोकांचा समावेश आहे. माजी सरपंच गोधन बसीने, मुन्नालाल लिल्हारे, विजय लिल्हारे यांनी यादीेवर आक्षेप नोंदविला.
अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार
मागील लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणूक, जि.प. व पं.स. निवडणूक मतदार यादीमध्ये बºयाच मतदारांची नावेच नव्हती. तर आता मात्र मतदार यादीत ३४ बोगस नावांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्हा निवडणूक विभागाने बोगस नावे वगळून नव्याने मतदार यादी जाहीर न केल्यास आगामी ग्रा.पं.च्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा गावकºयांना दिला आहे.