तालुक्यातील बेरडीपार शाळेचा मॉडेल स्कूलमध्ये समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:25 AM2021-02-20T05:25:22+5:302021-02-20T05:25:22+5:30
बिरसी फाटा : जिल्ह्यातील ८ आणि संपूर्ण राज्यातील ३०० शाळा मॉडेल स्कूलमध्ये रूपांतरित होणार आहेत. या संदर्भात ...
बिरसी फाटा : जिल्ह्यातील ८ आणि संपूर्ण राज्यातील ३०० शाळा मॉडेल स्कूलमध्ये रूपांतरित होणार आहेत. या संदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने राज्यातील प्रत्येक तालुक्यात १ आदर्श शाळा विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षण विभागाने प्रकल्पात सुसज्ज ८ शाळांची यादी समाविष्ट केली असून हा प्रस्ताव सरकारला पाठविण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळा खासगी शाळांप्रमाणे सुसज्ज करण्यासाठी शिक्षण विभागामार्फत ‘मॉडेल स्कूल’ ही संकल्पना राबविली जात आहे. तालुकास्तरावर शाळेची निवड करून भौतिक सुविधा व शैक्षणिक गुणवत्तेसाठी आवश्यक असलेल्या सर्व संसाधनांची उपलब्धता व प्रशासकीय नियोजन या विषयांवर लक्ष केंद्रित केले आहे. याअंतर्गत यंदा जिल्ह्यातील ८ शाळांना मॉडेल स्कूल करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाकडून पाठवण्यात आला आहे. या शाळांमध्ये अर्जुनी-मोरगाव तहसील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा बाक्टी-चान्ना, आमगाव तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शिवनी, देवरी तालुक्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा सावली, गोंदिया तालुक्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा कुडवा (मुले), गोरेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा हिरडामाली, सालेकसा तलुक्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा बोदलबोडी, सडक-अर्जुनी तालुक्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा पारसोडी व तिरोडा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेरडीपार यांचा समावेश आहे.
----------------------
इतर शाळांच्या तुलनेत अत्याधुनिक शिक्षण प्रणाली
अत्याधुनिक शिक्षण प्रणाली आणि विविध उपक्रम मॉडेल शाळांमध्ये वापरले जातील. पहिल्या ८ तालुक्यांमध्ये प्रत्येकी १ शाळा निवडली आहे. परंतु नियमांच्या आधारे शाळांची तपासणी केली असता त्यात दोष असल्याचे दिसून आले. त्यानंतर प्रकल्पातून सरकारला गटशिक्षणाधिकाऱ्याकडून मॉडेल स्कूल प्रकल्पासाठी पात्र शाळांच्या नवीन यादीबद्दल माहिती मिळाली. यावर शिक्षण विभागाने शाळांची पाहणी करून मॉडेल स्कूलसाठी ८ शाळा निवडल्या आहेत.