एका एकरात घेतले दीड लाखांचे उत्पन्न
By admin | Published: April 17, 2016 01:34 AM2016-04-17T01:34:16+5:302016-04-17T01:34:16+5:30
धानाच्या शेतीला बागायती शेतीकरुन जास्तीत जास्त पैसा कसा मिळवावा याचे उदाहरण तालुक्यातील एका कृषी पर्यवेक्षकांनी शेतकऱ्यांना दाखविला आहे.
कृषी पर्यवेक्षकाची कामगिरी : शेतकऱ्यांसाठी ठरताहेत प्रेरणादायी
राजेश मुनीश्वर सडक अर्जुनी
धानाच्या शेतीला बागायती शेतीकरुन जास्तीत जास्त पैसा कसा मिळवावा याचे उदाहरण तालुक्यातील एका कृषी पर्यवेक्षकांनी शेतकऱ्यांना दाखविला आहे. त्यांनी एका एकरात चक्क दीड लाखांचे उत्पन्न घेऊन शेतकऱ्यांना हा प्रयोग करून दाखविला आहे.
गोरेगावचे कृषी पर्यवेक्षक एफ.आर.टी. शहा यांनी तालुक्यातील डव्वा येथे दीड एकर शेतीत काकडी, भेंडी, कनस आदीचे पिके घेवून आर्थिक नफा कसा मिळवावा हे दाखवून दिले आहे. धानाच्या शेतीला बागायती करण्यासाठी शहा यांना ८० हजार रुपये खर्च आला. मातीचे सरी करुन पालीवायर, बांबू, कॉटन धागा, मल्चिंग, महागळी संकरीत बियाणे, वाटर सोलूबल खते, ठिंबक सिंचनाच्या माध्यमातून कमी पाण्यात बागायती शेती ते करीत आहेत. कमी पाण्यात, कमी मजुरीत बागायती शेती करण्याचे प्रात्यक्षिक व धडे शेतकऱ्यांना शहा यांच्या शेतात पहावयास मिळत आहे.
शहा यांनी दीड एकर शेतीतील एक एकरात काकडी तर अर्धा एकरात भेंडीची लागवड केली आहे. या दीड एकराच्या पिकासाठी संपूर्ण खर्च एक लाख ४० हजार रुपये आला असून खर्च वजा जाता निव्वळ नफा हा एक लाख ५० हजार होणार असल्याची माहिती शहा यांनी दिली. भेंडी व काकडीची देखभाल करण्यासाठी सहा मजुरांना कामावर ठेवले आहे. ठिंबक सिंचनाच्या माध्यमातून दररोज सकाळी व संध्याकाळी पाणी देण्याचे काम होत आहे. कृषी पर्यवेक्षक शहा यांच्या पत्नी आत्मा शहा या शेती व्यवसायाला प्रोत्साहन देत आहेत. यांच्याच मदतीने या शेतात मधुमक्षीका पालन, शेळी पालन, कबुतर पालन व्यवसाय येत्या १५ दिवसांत सुरू होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
काकडीचे उत्पादन काढताना कमी किटकनाशकांची फवारणी करुन किटकांच्या नियंत्रणासाठी ठिकठिकाणी किटक सापळे लावले आहेत. या किटक सापळ्यांमध्ये मादी योनीचे सुगंध लावला असल्यामुळे परिसरातील हजारो नर किटक त्या कीटक सापळा डब्यात मेलेले पहावयास मिळतात. या किटक सापळ््यांमुळे परिसरात पिकांना नुकसान करणाऱ्या किटकांची संख्या कमी झाल्याचे दिसून येत आहे.
दीड एकर शेतीच्या सभोवताली शेवगा शेंग, झाडांची लागवड केली आहे. यामुळे आयुर्वेदिक शेवगाच्या शेंगा बाजारात विक्रीकरिता मिळणार आहेत. शेवगाच्या शेंगेला तालुक्यात मागणी असल्यामुळे शेवगाची शेकडो झाडे लावल्याचे शहा यांनी सांगितले.
शेतकऱ्यांसाठी मोफत मार्गदर्शन
शहा हे गोरेगाव येथील मंडळ कृषी अधिकारी कार्यालयात कृषी पर्यवेक्षक म्हणून पदावर आहेत. ते ३० एप्रिल २०१६ ला सेवानिवृत्त होणार आहेत. सेवानिवृत्तीनंतर ते आपल्या फार्म हाऊसवर शेतकऱ्यांसाठी मोफत मार्गदर्शन केंद्र उघडणार आहेत. पुढील महिन्यापासून दुसरा व चौथा सोमवार मोफत मार्गदर्शन दिवस ठरवून शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे. शहा हे अष्टपैलू व्यक्ती असल्याने सडक अर्जुनी, देवरी, अर्जुनी मोरगाव व गोरेगाव या झाडीपट्टी परिसरात नाटकाचे उद्घाटन प्रसंगी विविध पिकांच्या विषयी मार्गदर्शन करण्याचे काम त्यांनी केले आहे. कमी खर्चात जास्त आर्थिक नफा कसा मिळवावा यासाठी मार्गदर्शन केले जाईल हे विशेष.