मालवाहतुकीतून आगाराला चार लाखांचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 05:00 AM2020-10-23T05:00:00+5:302020-10-23T05:00:24+5:30
कोरोना हा संसर्गजन्य आजार असून देशात शिरकाव होताच त्याचा प्रसार होऊ नये या दृष्टीने शासनाने उपाययोजना म्हणून अवघ्या देशात २५ मार्चपासून लॉकडाऊन केला आहे. अशात प्रवासी वाहतुकीतून कोरोना प्रसार होऊ नये म्हणून रेल्वे, एसटी, विमान व अन्य प्रवासी माध्यमांवर बंदी लावण्यात आली होती. यामुळे मात्र अगोदरच तोट्यात असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे या लॉकडाऊनने कंबरडे मोडले होते.
कपिल केकत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : प्रवासी वाहतुकीतून कोरोनाचा संसर्ग पसरू नये या दृष्टीने राज्य शासनाने लालपरीवर बंदी लावली होती. त्यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला मोठा फटका बसला आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी महामंडळाने आता एसटीतून मालवाहतुकीचा प्रयोग सुरू केला आहे. त्यानुसार, गोंदिया आगाराने आतापर्यंत ३५ बुकींग केल्या असून त्यातून आगाराच्या तिजोरीत ३ लाख ९२ हजार ५६४ रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
कोरोना हा संसर्गजन्य आजार असून देशात शिरकाव होताच त्याचा प्रसार होऊ नये या दृष्टीने शासनाने उपाययोजना म्हणून अवघ्या देशात २५ मार्चपासून लॉकडाऊन केला आहे. अशात प्रवासी वाहतुकीतून कोरोना प्रसार होऊ नये म्हणून रेल्वे, एसटी, विमान व अन्य प्रवासी माध्यमांवर बंदी लावण्यात आली होती. यामुळे मात्र अगोदरच तोट्यात असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे या लॉकडाऊनने कंबरडे मोडले होते.
अशात हळूहळू राज्य शासनाने लॉकडाऊन शिथिल करीत राज्य परिवहन महामंडळाला जिल्ह्यातंर्गत फेऱ्यांसाठी मंजुरी दिली. मात्र नागरिक घराबाहेर निघणे व त्यातही गर्दीत वावरणे टाळत असल्याने एसटीला तेवढा प्रतिसाद मिळणे कठीण दिसत होते. असेच सुरू राहिल्यास झालेले नुकसान भरून काढणे शक्य होणार नाही. याकरिता महामंडळाने मालवाहतुकीचा प्रयोग प्रथमच सुरू केला. त्यामुळे आता लालपरी प्रवाशांसोबतच मालवाहतुकीचे काम करू लागली आहे. या मालवाहतुकीच्या प्रयोगात गोंदिया आगाराने आतापर्यंत ३५ बुकींग पूर्ण केल्या असून त्यातून तीन लाख ९२ हजार ५६४ रूपयांचे उत्पन्न मिळविले आहे.
जुलै महिन्यात मिळाला उत्तम प्रतिसाद
आगाराला जून महिन्यात ४ बुकींग मिळाल्या व त्यातून १३ हजार ७६५ रूपयांचे उत्पन्न तिजोरीत जमा झाले. जुलै महिन्यात उत्तम प्रतिसाद मिळाला असून १४ बुकींगमधून आगाराला ९९ हजार ५६५ रूपये, ऑगस्ट महिन्यात १० बुकींग केल्या असून त्यातून एक लाख ४९ हजार ६५४रूपये, सप्टेंबर महिन्यात ५ बुकींगमधून ८२ हजार ६०० रूपये तर तर ऑक्टोबर महिन्यात २ बुकींग केल्या असून त्यातून ४६ हजार ९८० रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
सुरक्षित वाहतूक असल्याने विश्वास
कोरोनामुळे बसलेला फटका भरून काढण्यासाठी एसटी आता मालवाहतुकीत आल्याने त्यांना प्रयत्न करावे लागणार आहे. शिवाय एसटी १० टन क्षमतेची परवानगी आहे. तर ट्रांसपोर्ट त्यापेक्षा जास्त क्षमतेची बुकींग घेऊन घेतात. तरिही एसटी सर्वांच्या विश्वासाची असल्याने लवकरच या क्षेत्रातही त्यांची चांगली पकड निर्माण होणार यात शंका नाही.